नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये पुन्हा एकदा झटापट झाल्याची माहिती समोर येत आहे. पूर्व लडाखमधील पँगाँग तलाव परिसरात चिनी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले. भारत आणि चीन सैन्यामध्ये झालेल्या बैठकांमध्ये काही गोष्टींबद्दल सहमती झाली होती. मात्र, त्यांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात आल्याची माहिती भारतीय सैन्याने दिली आहे. दरम्यान, यावरून काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोळ्यात चीनविरोधात राग कधी दिसणार, असा सवाल काँग्रेसने केला आहे. यासंदर्भात कांग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी ट्विट केले आहे. भारताच्या हद्दीत घुसण्याचा पुन्हा प्रयत्न झाला. चीनकडून सतत अशा प्रकारचे कृत्य सुरु आबे. पँगाँग परिसर, गोगरा व गलवान खोरे, डेपसंग, प्लॅनस, लिपुलेख या भागात भारतीय जवान आपले कर्तव्य बजावत आहेत. पण, मोदींचे लाल डोळे कधी दिसणार? असा सवाल रणदीपसिंह सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे.
काँग्रेसचे नेते जयवीर शेरगिल यांनीही ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर निशाणा साधला आहे. "सोशल मीडियावरील इतर मुद्द्यांचा बचाव करण्यासाठी भाजपा अॅक्टिव्ह मोडमध्ये येते. परंतु चीनच्या मुद्द्यांवर स्लीपमोडमध्ये आहे. या मुद्द्यांवर पत्रकार परिषद कधी होईल? घुसखोरी कशामुळे झाली? यथास्थिती केव्हा पुनर्संचयित केली जाईल? बेदखल करण्यासाठी कोणती पावले उचलली गेली? सरकार चीनचे नाव घेण्यास का घाबरत आहे?", असे प्रश्न जयवीर शेरशिल यांनी केले आहेत.
दरम्यान, पँगाँग तलावाच्या दक्षिणी किनाऱ्यावरून चिनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केला. त्याला भारताने विरोध केला. चिनी सैन्याला भारतीय सैन्याने रोखले. त्यानंतर भारताने या भागातील फौजफाटा वाढविला. गेल्या चार महिन्यांपासून पूर्व लडाखमधील सीमावर्ती भागातील तणाव कमी झालेला नाही. तणाव कमी करण्यासाठी दोन्ही सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. मात्र अद्यापही परिस्थितीत बदल झालेला नाही. एप्रिल पूर्वी असलेली परिस्थिती कायम ठेवावी, अशी स्पष्ट भूमिका भारतानं घेतलेली आहे. एका बाजूला लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू असताना दुसऱ्या बाजूला परराष्ट्र मंत्रालयांच्या माध्यमातूनही चर्चा सुरू आहेत. पूर्व लडाखमधून सैन्य माघारी घेण्याबद्दल दोन्ही देशाचे एकमत झाले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
आणखी बातम्या...
- फ्री ट्रायलसोबत JioFiber चे नवे प्लॅन लाँच, OTT अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळणार
- 'या' कंपनीकडून Permanent Work From Homeची सुविधा, ७५ टक्के कर्मचारी करणार घरून काम
- 'पिया तू अब तो आजा...' या गाण्यावर वृद्ध महिलांचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल