राहुल राम, तर मोदी रावण; काँग्रेसच्या पोस्टरनं मध्य प्रदेशात रामायण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 10:22 AM2019-02-08T10:22:21+5:302019-02-08T10:41:15+5:30
काँग्रेसच्या पोस्टरवर मोदींसह भाजपाच्या बड्या नेत्यांचे आणि मंत्र्यांचे चेहरे
भोपाळ: काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वारंवार राफेल विमान खरेदी प्रकरणावरुन निशाणा साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशात काँग्रेसनं लावलेल्या पोस्टरनं खळबळ माजली आहे. या पोस्टरवर नरेंद्र मोदींना रावणाच्या रुपात दाखवण्यात आलं आहे. तर राहुल गांधींना रामाच्या रुपात दाखवण्यात आलं आहे. राहुल गांधी मोदींच्या दिशेनं बाण मारण्यास सज्ज झाल्याचं या पोस्टरवर दिसत आहे.
काल राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांनी एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले चढवले. यानंतर मध्य प्रदेशात आज काँग्रेसनं पोस्टर लावून मोदी आणि भाजपावर निशाणा साधला. राफेल डीलवरुन राहुल गांधी पंतप्रधानांवर सतत टीकास्त्र सोडत असताना आता मध्य प्रदेश काँग्रेसनं याचवरुन पोस्टरवॉर सुरू केलं आहे. काँग्रेसच्या पोस्टरमध्ये मोदींना रावणाच्या रुपात दाखवण्यात आलं आहे. पोस्टरवर मोदींची दहा तोंडं दिसत आहेत. यावर भाजपा अध्यक्ष अमित शहा, अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे चेहरे पोस्टरवर दिसत आहेत.
'चोरो तुम्हारी खैर नहीं, हम राम भक्त है. चोरों के अलावा किसी से बैर नहीं', असा मजकूर या पोस्टरवर आहे. याशिवाय एका राफेल विमानासह 'चौकीदार ही चोर है' ही राहुल गांधींनी दिलेली घोषणादेखील पोस्टरवर आहे. याआधीही अनेकदा राहुल यांना काँग्रेसनं पोस्टरवर राम भक्ताच्या रुपात दाखवलं आहे. मात्र या पोस्टरमधून राम मंदिराच्या मुद्द्याला स्पर्श करत काँग्रेसनं राफेल डीलवरुनही भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता या पोस्टरवर भाजपाकडून काय प्रतिक्रिया येणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.