- जंतरमंतर ते संसद जोरदार महामार्च
नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष कोणत्या मातीतून घडलाय, याची त्यांना कल्पना नाही. बदनाम करण्याचा कितीही प्रयत्न करा, आम्ही घाबरणार नाही. आयुष्याने मला संघर्ष करायला शिकवला. गरज पडली तर स्वत:चे बलिदान देण्यासही मी मागेपुढे पाहणार नाही, अशा आक्रमक आवेशात सोनिया गांधींनी मोदी सरकारवर थेट हल्ला चढवला. ‘लोकशाही वाचवा’ची हाक देत मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसने जंतर-मंतरपासून संसदेपर्यंत भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. तिथे काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर त्या बोलत होत्या. एरवी संयत स्वरात विरोधकांवर टीका करणाऱ्या सोनिया गांधी यांचा आवेश सुरुवातीपासून रणरागिणीसारखा आक्रमक होता. अगुस्ताप्रकरणी सरकारच्या सूड प्रवासाच्या विरोधात काँग्रेसने रस्त्यावर उतरण्याचे ठरवले, तेव्हा मोदींचा थेट नामोल्लेख करीत सरकारवर कठोर प्रहार करीत सोनिया यांनी देशात आज समाधानी कोण आहे, असा सवाल केला. त्या म्हणाल्या, तरुण, शेतकरी, कामगार सारेच मोदी सरकारच्या कामकाजामुळे त्रस्त आहेत. जनतेला खोटी स्वप्ने दाखवून मोदींनी सत्ता मिळवली. काँग्रेसने पंचायत राज व्यवस्था मजबूत केली, मोदी सरकार लोकशाही व्यवस्थाच उखडून टाकायला निघाले. आम्ही मात्र कोणत्याही स्थितीत त्यांचे इरादे यशस्वी होऊ देणार नाही.’भ्रष्टाचाराचे आरोप आणि लोकशाहीवर हल्ला या दोन विषयांवर काँग्रेस आणि भाजपा हे दोन प्रमुख पक्ष शुक्रवारी परस्परांसमोर उभे ठाकले होते. काँग्रेसने जंतर-मंतरवर निषेध रॅली केली, तर भाजपा खासदारांनी संसदेच्या प्रांगणात भ्रष्टाचाराच्या विरोधात घोषणा देत धरणे धरले. निषेध फलकांवर ‘निर्णय आया इटली में, बेचैन दलाल दिल्ली में’, ‘घूस देनेवाला जेल में, लेनेवाला कौन?’ अशा घोषणा होत्या. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांचे चांगले प्रतिनिधीत्व दिसले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. खा. विजय दर्डा, प्रदेश सरचिटणीस गणेश पाटील, माजी मंत्री अनीस अहमद, नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, खा. राजीव सातव, प्रदेश सचिव अतुल कोटेचा आणि मुजीब पठाण यांचा त्यात समावेश होता. महिला काँग्रेसच्या अध्यक्ष शोभा ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष चारुलता टोकस यांनी महिलांचे नेतृत्व केले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील युवक दिल्लीत पोहोचले होते. महाराष्ट्रातून दिल्लीत आलेल्या प्रत्येक रेल्वेत काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी होती. काँग्रेस भारताचा आत्मारॅलीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले, ‘काँग्रेसशासित राज्य सरकारांच्या विरोधात मोदी सरकारने कारस्थाने रचली आहेत. उत्तराखंड व अरुणाचल प्रदेशात लोकांनी निवडून दिलेले काँग्रेसचे सरकार बळजबरीने पाडले. लोकशाही व्यवस्थेवरच हा हल्ला आहे. हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि मिझोरममध्येही त्याची पुनरावृत्ती करण्याचा सरकारचा इरादा आहे. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्या मोदींना एकच गोष्ट स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की, काँग्रेस भारताचा आत्मा आहे. काँग्रेसची सरकारे पाडून मोदींनी या आत्म्यावरच आघात केला आहे. न्यायालये आणि विद्यापीठेही देशात सुरक्षित नाहीत. विद्यार्थी वर्गाला नामोहरम केले जात आहे. मोदी सतत काँग्रेसला नेस्तनाबूद करण्याची भाषा करतात. थोडक्यात बचावले नेते....सोनिया गांधी जंतरमंतरवर पोहोचताच तेथे उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. नारेबाजीला जोर चढला. त्याचवेळी पोलिसांनी शक्तिप्रयोग केला. काँग्रेसचे कोषाध्यक्ष मोतीलाल व्होरा आणि ज्येष्ठ नेते अहमद पटेल थोडक्यात बचावले. माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांच्या पोटाला किरकोळ दुखापत झाली. अनेक नेत्यांचे जोडे आणि घड्याळे तेथेच पडली होती. तसेच खा. विजय दर्डा यांचे पैशांचे पाकीटही गायब झाले.मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवीत राहुल गांधी म्हणाले, देशात फक्त दोनच लोकांची सध्या चलती आहे. पहिले नरेंद्र मोदी आणि दुसरे मोहन भागवत. भारताचा ४0 टक्के भाग आज दुष्काळाने होरपळतो आहे. दररोज ५0 शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मोदी सरकारच्या विरोधात ठामपणे जो बोलतो, त्याच्यावर खोटेनाटे आरोप केले जातात, हेच आजचे वास्तव आहे.हेलिकॉप्टर खरेदीत ‘मोठ्या’ अपराध्यांनाही शिक्षा : मोदीपल्लकड/चेन्नई : अगुस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर्सच्या वादग्रस्त खरेदी व्यवहारात कोणी कितीही मोठा असला तरी त्याला शिक्षा होईलच, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. या व्यवहाराबद्दल मिलान येथील न्यायालयाने दिलेल्या निकालावरील आपले मौन सोडताना मोदी यांनी या व्यवहाराचे ‘चोरी’ असे वर्णन केले.