व्यंकटेश केसरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सततचे मोठे पराभव झाल्यानंतरही विचलित न झालेल्या काँग्रेस पक्षाची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांच्याच गुजरात राज्यात शह देण्यासाठी नवी योजना असून त्यासाठी निवडणूक व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांची मदत घेण्यात येत आहे. गुजरातमध्येकाँग्रेस दोन दशकांपासून सत्तेपासून दूर आहे. २०२२ मध्ये तेथे विधानसभा निवडणूक होणार आहे.
“गुजरातमधील लढाईसाठी राहुल गांधी हे प्रशांत किशोर यांना व्यूहरचनात्मक नियोजनात सहभागी करून घेण्याचे नियोजन करीत आहेत. गुजरातसाठी राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या काही योजना आहेत आणि नुकतीच या दोघांची प्रशांत किशोर यांच्याशी झालेली भेट ही त्यादिशेने पुढचे पाऊल आहे. भाजपला पुढील वर्षी उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये अडवता आले तर २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत त्याची प्रचार मोहीम दुबळी करता येईल याची चांगली कल्पना पक्ष श्रेष्ठींना आहे”, असे गुजरातमधील ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
गुजरातमध्ये काँग्रेस भलेही सत्तेत नाही पण उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल व इतर राज्यांत तो जसा अतिक्षीण झाला तशी त्याची अवस्था गुजरातेत नाही. आमचा मतदारांतील पाया पक्का आहे. संघटनात्मक रचना आहे, असे हा नेता म्हणाला. राहुल गांधी यांनी प्रशांत किशोर यांचा सल्ला उत्तर प्रदेशमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत घेतला होता. परंतु, पाठक यांनी सांगितल्याप्रमाणे काम केले गेले नाही. समाजवादी पक्षासोबत केलेली युती काँग्रेसला महागात पडली.
गुजरातला नवी टीम
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी या गुजरात काँग्रेसला नवी टीम देण्याची आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीत गुजरातसाठी ज्येष्ठ व अनुभवी नेता नियुक्त करतील अशी अपेक्षा आहे. हा नेता प्रशांत किशोर आणि त्यांच्या तुकडीशी समन्वय ठेवेल.