कर्नाटकला भारतापासून वेगळे करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न; मोदींची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 05:26 AM2023-05-08T05:26:56+5:302023-05-08T05:28:39+5:30

रोड शो आणि प्रचार सभांचा धडाका

Congress attempt to separate Karnataka from India Prime Minister Narendra Modi Criticism on congress | कर्नाटकला भारतापासून वेगळे करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न; मोदींची घणाघाती टीका

कर्नाटकला भारतापासून वेगळे करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न; मोदींची घणाघाती टीका

googlenewsNext

शिवमोग्गा :कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले. ‘खोटे कामी येत नसल्याने घाबरलेल्या काँग्रेसने अखेर ज्यांना प्रचारात सहभागी व्हायचे नव्हते, त्यांना प्रचारात उतरवले,’ असा घणाघात त्यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे नाव न घेता केला. तसेच कर्नाटकला भारतापासून वेगळे करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केल्याचा आरोप मोदींनी केला.

प्रकृतीच्या कारणास्तव २०१९ पासून प्रचार सभांपासून दूर राहिलेल्या सोनिया गांधी यांनी शनिवारी हुबळी येथे निवडणूक सभेला संबोधित केले होते. त्यावरून मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले. काँग्रेसने कर्नाटकला भारतापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून माेदी म्हणाले की, काँग्रेस पक्ष देशाच्या राजकारणात हस्तक्षेप करण्यासाठी परकीय शक्तींना उघडपणे चिथावणी देतो.

२ लाख नोकऱ्यांचे आश्वासन खोटे

खासगी क्षेत्रात दरवर्षी दोन लाख नोकऱ्या देण्याचे काँग्रेसचे आश्वासन खोटे असल्याचे सांगत पंतप्रधानांनी राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारने गेल्या साडेतीन वर्षांत कोविड साथीच्या आजारानंतरही दरवर्षी १३ लाखांहून अधिक लोकांना औपचारिक नोकऱ्या दिल्या, असा दावा केला. काँग्रेसने खोटे पसरवण्यासाठी एक तंत्र तयार केले आहे, परंतु खोटे कितीही फुगवले तरी निवडणुकीत त्याचा प्रभाव पडणार नाही, असेही ते म्हणाले.

‘रोड शो’बंगळुरूत मोठा प्रतिसाद

मोदी यांनी रविवारी सकाळी बंगळुरूमध्ये आठ किमीचा रोड शो केला. या वेळी पंतप्रधानांच्या चाहत्यांनी रस्त्यावर तसेच इमारतींवर गर्दी केली होती. पंतप्रधानांनीही त्यांना अभिवादन केले. लोकांनी पंतप्रधानांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी केली. पंतप्रधानांनीही लोकांच्या दिशेने फुले फेकली. ट्रिनिटी सर्कल येथे रोड शोच्या शेवटी पंतप्रधानांनी पुन्हा हात जोडून लोकांना संबोधित केले.

‘नीट’ परीक्षेमुळे ‘रोड शो’ घेतला आवरता

‘रोड शो’ला मिळालेल्या उदंड प्रतिसादाने आपण भारावून गेल्याचे ते म्हणाले. ‘आज एक लांब रोड शो होणार होता, पण नीट परीक्षेमुळे मी माझ्या पक्षाला सांगितले की आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. म्हणून आम्ही सकाळी रोड शो केला आणि पटकन तो पूर्णही केला,’ असे त्यांनी सांगितले.

Web Title: Congress attempt to separate Karnataka from India Prime Minister Narendra Modi Criticism on congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.