नितीन अग्रवाल नवी दिल्ली : दहशतवाद्यांशी संबंध असल्याबद्दल जम्मू-काश्मीरमध्ये अटक करण्यात आलेले उप पोलीस अधीक्षक दविंदर सिंग यांच्यावरून काँग्रेस व भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसच्या टीकेला उत्तर देताना भाजपने म्हटले आहे की, काँग्रेस हिंदुंना दहशतवादी सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असून पाकिस्तानची बाजू घेत आहे.
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा मंगळवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘दहशतवादी कारवायांत सहभागी असल्याबद्दल दविंदर सिंग यांना अटक झाली असून कायदा त्याचे काम करीत आहे. परंतु, काँग्रेसचा हातखंडा ज्यात आहे तेच काम तो करीत आहे.काँग्रेसने पुन्हा एकदा भारतावर हल्ला केला व तो पाकिस्तानला वाचवण्याच्या प्रयत्नांत आहे. त्या पक्षाचे नेते अधिर रंजन चौधरी यांनी या प्रकरणी धर्म शोधून काढला आहे. काँग्रेस हिंदुंना दहशतवादी सिद्ध करण्याच्या प्रयत्नांत असून भारताला हिंदुंपासून धोका असल्याचे त्याचे म्हणणे आहे.’
‘पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याबद्दल जर काँग्रेसला संशय असले तर त्याने याचा खुलासा जाहीरपणे करायला हवा’, असे पात्रा म्हणाले. भारताच्या लष्करावर आमचा विश्वास नाही हे काँग्रेसने जाहीर करायला हवे. पाकिस्तान व काँग्रेस यांच्यात काही तरी नाते असावे. कारण हा पक्ष पाकिस्तानची भाषा वारंवार बोलत असतो. काँग्रेस लष्कराच्या नव्या प्रमुखांवरही शेरेबाजी करतो. काँग्रेस नेत्यांची वक्तव्ये घेऊन पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांत जाईल व भारतावर टीका करील, असेही संबित पात्रा म्हणाले.
तत्पूर्वी, अधिर रंजन चौधरी पुलवामा हल्ल्यावर प्रश्नचिन्ह लावून टिष्ट्वटरवर म्हणाले होते की, ‘दविंदर सिंग हे मूळात देवेंद्र सिंह असले असते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ट्रोल लष्कराची प्रतिक्रिया जास्त तिखट असती. देशाच्या शत्रुची निंदा धर्म, पंथ आणि रंग बाजुला ठेवून व्हायला हवी.’