बिहारनंतर आता उत्तर प्रदेश, इंडिया आघाडीत बिघाडी! सपा निर्णयावर काँग्रेस नाराज; दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 11:49 AM2024-02-01T11:49:33+5:302024-02-01T11:52:50+5:30

INDIA Alliance News: सर्व पर्याय खुले आहेत. काँग्रेस लाचार नाही, असा सांगत समाजवादी पक्षाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

congress avinash pandey slams samajwadi party over decision regarding candidate list declared lok sabha election 2024 | बिहारनंतर आता उत्तर प्रदेश, इंडिया आघाडीत बिघाडी! सपा निर्णयावर काँग्रेस नाराज; दिला इशारा

बिहारनंतर आता उत्तर प्रदेश, इंडिया आघाडीत बिघाडी! सपा निर्णयावर काँग्रेस नाराज; दिला इशारा

INDIA Alliance News: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला धूळ चारण्यासाठी विरोधकांनी सुरू केलेली इंडिया आघाडीच आता धुळीत मिळते काय, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. जागावाटपाचा निर्णय न झाल्याने इंडिया आघाडीतील घटक पक्ष नाराज आहेत. पश्चिम बंगाल, पंजाब, बिहारमध्ये अनुक्रमे ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीने, अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असून, नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीलाच रामराम करत एनडीएसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर आता उत्तर प्रदेशमध्येही इंडिया आघाडीत बिघाडी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने लोकसभेच्या १६ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि विद्यमान खासदार डिंपल यादव यांच्या नावाचाही समावेश आहे.  समाजवादी पार्टीने घेतलेल्या या निर्णायवर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचेउत्तर प्रदेशमधील प्रभारी महासचिव अविनाश पांडे यांनी समाजवादी पक्षावर टीका करत, काँग्रेस विनम्र आहे पण लाचार नाही, असे सांगत थेट इशारा दिला आहे. 

काँग्रेसकडे अन्य पर्याय खुले आहेत

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर अविनाश पांडे लखनौमध्ये आले होते. ही यात्रा १४ फेब्रुवारीला उत्तर प्रदेशमध्ये दाखल होणार आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या तयारीचा आढावा अविनाश पांडे यांनी घेतला. काँग्रेसकडे अन्य पर्याय खुले आहेत. काही लोक काँग्रेसविरुद्ध धारणा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस विनम्र राहू शकते. सहकार्य करू शकते. मात्र, काँग्रेस लाचार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे अविनाश पांडे यांनी नमूद केले. तसेच समाजवादी पक्षाने घेतलेला निर्णय पूर्णपणे एकतर्फी  आणि अस्वीकार्य आहे. उत्तर प्रदेशमधील काँग्रेस कार्यकर्त्याला ही गोष्ट आवडलेली नाही. एका बाजूला एकत्र बसून चर्चा करायची आणि दुसऱ्या बाजूला परस्पर निर्णय घेऊन काँग्रेसला संदेश देण्याचा प्रयत्न करायचा, असेही अविनाश पांडे यांनी बोलून दाखवले.

दरम्यान, काँग्रेस खुल्या मनाने जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. इंडिया आघाडीचे काही नियम आहेत आणि सपा नेते याचे उल्लंघन करत असल्याचे दिसत आहे. सपा नेत्यांनी घेतलेला निर्णय हास्यापद असून, कदाचित अखिलेश यादव यांनाही या निर्णयाची माहिती नसावी, असा दावा अविनाश पांडे यांनी केला. काँग्रेस पक्षाला असा निर्णय घेणे सहज शक्य होते. मात्र, तसे केले नाही. एकत्रित पुढे जाण्यावर आमचा विश्वास आहे, या शब्दांत सपाने घेतलेल्या निर्णयाचा खरपूस शब्दांत अविनाश पांडे यांनी समाचार घेतला.
 

Web Title: congress avinash pandey slams samajwadi party over decision regarding candidate list declared lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.