धनबाद : ईशान्य भारतातील लोकांच्या हिताची भाजप सरकार प्राधान्याने जपणूक करील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.झारखंड विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान धनबाद येथे एका सभेत गुरुवारी त्यांनी सांगितले की, आसाम व ईशान्य भारतातील अन्य आदिवासी जमातींची वांशिक ओळख पुसली जाणार नाही याची काळजी केंद्र सरकार घेईन. त्यामुळे तेथील नागरिकांनी माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवावा असे आवाहनही त्यांनी केले.
अफगाणमध्ये तालिबानींनी हल्ले चढविल्यानंतर तेथील अनेक ख्रिश्चन भारतात आश्रयासाठी आले. शेजारील देशांतील धार्मिक छळाला कंटाळलेल्या दलित, शीख, ख्रिश्चन आदी धर्माच्या लोकांना दिलासा देण्यासाठी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक तयार करण्यात आले आहे. तरीही या विधेयकाला काँग्रेस विरोध करत आहे असा आरोप मोदी यांनी केला. मोदी म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे आसामसहित ईशान्य भारतातील कोणत्याच राज्यातल्या नागरिकांचे हक्क हिरावून घेतले जाणार नाहीत. काँग्रेसने ३७० कलम, अयोध्या विवाद अशा अनेक प्रश्नांवर कोणताही तोडगा काढण्याचे टाळले. ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप सरकारने पावले उचलली.
विधेयक घटनाविरोधी -तिवारी
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यघटनेतील तरतुदींच्या विरोधात असून त्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ईशान्य भारतातील किमान १० वेगवेगळ््या संघटनांनी या विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासंदर्भात काँग्रेसच्या कायदा विभागाशी संपर्क साधला होता. (वृत्तसंस्था)
डाव्या पक्षांतर्फे १९ला देशव्यापी आंदोलननागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात डावे पक्ष १९ डिसेंबर रोजी देशव्यापी आंदोलन करणार आहेत. त्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट)- लिबरेशन, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, रेव्होल्युशनरी सोशॅलिस्ट पार्टी हे डावे पक्ष सहभागी होतील. त्यांनी यासंदर्भात गुरुवारी एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, हे विधेयक राज्यघटनेतील तरतुदींच्या विरोधात असून, त्यामुळे भारताचा सेक्युलर लोकशाहीचा पाया उद््ध्वस्त होणार आहे. देशात सामाजिक व धार्मिक फूट पडेल. स्वातंत्र्यसंग्रामध्ये प्रख्यात नेते रामप्रसाद बिस्मिल यांनी १९ डिसेंबर १९२७ साली ‘सरफरोशी की तमन्ना अब भी हमारे दिल में है’, अशी घोषणा दिली होती. हे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन या १९ डिसेंबरलाच आंदोलन करण्याचा निर्णय डाव्या पक्षांनी घेतला आहे.
संविधानाच्या आत्म्याला ठेच -प्रियांका गांधी
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून मोदी सरकारवर टीका करताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, भाजपकडून महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी होत असताना संविधानाच्या आत्म्याला ठेच पोहोचविणारे विधेयक आणले जात आहे. मात्र, भाजपच्या विभाजनकारी प्रयत्नांविरुद्ध कॉँग्रेस मजबुतीने लढेल.
काँग्रेस सदस्यांचा सभात्याग
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकानंतर पूर्वोत्तरमध्ये हिंसाचार भडकला असल्याचे काँग्रेसने गुरुवारी लोकसभेत सांगितले.मात्र, पूर्वोत्तर राज्यांमध्ये मुख्य विरोधी पक्ष हिंसाचार भडकावीत आहे, असे सरकारने सांगितले. त्यानंतर काँग्रेस, द्रमुक आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला आणि सांगितले की, नागरिकत्व दुरुस्ती विधेयकानंतर पूर्ण पूर्वोत्तर राज्यात हिंसाचार पसरत आहे.तेथे सैन्याला तैनात करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, पूर्वोत्तर राज्यात इंटरनेट बंद आहे आणि परिस्थिती काश्मीरसारखी होताना दिसत आहे.चौधरी यांनी असाही आरोप केला की, काश्मीरमध्ये सरकार आणि भाजपमुळेच परिस्थिती सामान्य होत नाही. तशीच परिस्थिती पूर्वोत्तरमध्ये बनत आहे.