Bharat Jodo Yatra: कन्याकुमारी पासून सुरु झाल्यापासून प्रत्येक राज्यात प्रतिसाद वाढतोय. मध्य प्रदेशात भारत जोडो यात्रेचे जोरदार स्वागत झाले. भारतात विविधतेतून एकता निर्माण करत आहेत. महात्मा गांधी यांनी जे काम स्वातंत्र्यापूर्वी केलं ते आज राहुल गांधी करत आहेत. भारत जोडो यात्रा जेव्हा श्रीनगरला पोहोचेल तेव्हा संपूर्ण देश एक झालेला असेल याचा मला विश्वास आहे, असे महाराष्ट्र विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे मध्य प्रदेशात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक काँग्रेस नेत्यांनी जनसभेला संबोधित केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, भारत जोडो यात्रेने ६ राज्य पूर्ण करून आता मध्य प्रदेशात प्रवेश केला. या यात्रेचे जल्लोषात स्वागत केले. मध्य प्रदेशातही भारत यात्रींना भरभरून प्रेम व पाठिंबा मिळेल. मध्य प्रदेशातही पदयात्रा आणखी यशस्वी होईल. महाराष्ट्राच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करून मध्य प्रदेशही चांगले आदरातिथ्य करेल. महाराष्ट्रात यात्रेला लोकांचा भरपूर पाठिंबा मिळाला. विविध वर्गातील लोक यात्रेत सहभागी झाले होते. उत्कृष्ट आयोजनाबद्दल राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्राचे कौतुक केले.
महाराष्ट्राच्या जनतेने मोठा पाठिंबा दिला
भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राने खूप चांगले नियोजन आणि आयोजन केले त्यासाठी त्यांना A+ गुण दिले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने मोठा पाठिंबा दिला. १४ दिवसात महाराष्ट्राकडून खूप काही शिकायला मिळाले. महाराष्ट्रातून सर्व देशात संदेश गेला आहे. आता मध्य प्रदेशात ३७० किलोमीटरची पदयात्रा करून पुढचा प्रवास करत श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवणार, याला कोणीही रोखू शकत नाही. भारतात द्वेष, हिंसा आणि भिती पसरवली जात आहे याविरोधात ही भारत जोडो यात्रा आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भारत जोडो यात्रेने महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात प्रवेश केला. यावेळी बोरडेली जि. बुऱ्हाणपूर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कमलनाथ यांच्याकडे तिरंगा सोपवला. हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"