किरण अग्रवाल
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील शहराध्यक्षांच्या विरोधातील बंडोपंतांनी उचल खाल्ल्याने या पक्षाची अडचण झाली आहे खरी; परंतु वर्तमान अवस्थेत पक्षाच्या नशिबी आलेल्या ‘नाजूक’-पणाकडे दुर्लक्ष करून सारे रणकंदन चालले असल्याने, त्यातून अंतिमत: स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड पाडून घेतली गेली तर आश्चर्य वाटू नये. ‘दुष्काळात तेरावा महिना’ या उक्तीची आठवण व्हावी, असा हा शिमगा काँग्रेसमध्ये सुरू आहे.ठोकर लागल्यावर धडपडून उठणारे व सुधारणारे शहाणे म्हणवतात हे सर्वविदित आहे. मात्र ठोकर लागूनही न सुधारता मागचेच पाढे गिरवणाऱ्याला काय म्हणावे, असा प्रश्न कुणाला पडणार असेल तर त्याने यत्किंचितही शंका न बाळगता काँग्रेसकडे पाहायला हवे; कारण निवडणुकांच्या तोंडावरही सुधारण्याचे नाव न घेता अशी मानसिकता ठेवून त्याप्रमाणे वागण्यात या पक्षाच्या नेत्या-कार्यकर्त्यांचा हात कुणीही धरू शकणार नाही. निदान नाशकातील काँग्रेसची वाटचाल तरी याचदृष्टीने चालू आहे.
पुढच्याच महिन्यात होऊ घातलेल्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सारेच राजकीय पक्ष अंग झटकून कामाला लागले असताना नाशकातील काँग्रेसमध्ये वेगळेच राजकारण रंगले आहे. पक्ष कुठलाही असो, शेवटी राजकारण म्हटले की त्यात एकवाक्यता कुठेच नसते. तरी अंतिमत: पक्षाचे हित व त्यातून साधता येऊ शकणारे आपले स्वत:चे हित कशात आहे हे बघून प्रत्येकाकडून ‘बेरजे’वर भर दिला जातो. विशेषत: निवडणुकांना सामोरे जाताना तर अनिच्छेने का होईना नावडत्यांशीही हात मिळवूनच काम करावे लागते. पण नाशकातील काँग्रेसचे नेते त्याला अपवाद असावेत कदाचित. त्यांच्यातील गटा-तटांच्या भिंती व परस्परांबद्दलचा रोष वा दुराभिमान इतका पराकोटीला पोहोचला आहे की त्यापोटी केल्या जाणाऱ्या आगळीकीतून, ज्याच्या भरोशावर आपले अस्तित्व टिकून आहे त्या पक्षाच्याच प्रतिमेला धक्का तर पोहोचत नाही ना याचा साधा विचार करण्याचेही भान त्यांना उरलेले दिसत नाही. पक्षांतर्गत संतुष्ट-असंतुष्टांमध्ये सुरू झालेली धुमशान अगर निष्ठावान म्हणवणाऱ्यांचे अवेळी गरम झालेले ताबूत पाहता, हे लोक सुधरू शकत नाहीत, अशीच जनसामान्यांची भावना झाली तर आश्चर्य वाटू नये.मुळात, काँग्रेसमधील पक्षांतर्गत स्थिती वादातीत कधीच राहू शकलेली नाही. एकमेकांविरुद्ध सतत केल्या जाणाऱ्या कागाळ्या, बंडाळ्या यामुळे पक्षाच्या शहराध्यक्षपदी नेमल्या गेलेल्या कुणालाही सुखेनैव कामकाज करताच आलेले नाही. आणि दुसरे म्हणजे, पक्षांतर्गत विरोधकांना पुरून उरणारे व आपल्या कामकाजाची छाप उमटवू शकणारे नेतृत्वही या पक्षाकडे उरलेले नाही. त्यामुळे शहराची धुरा शहराबाहेरून आलेल्या व प्रारंभी प्रभारी म्हणून नेमल्या गेलेल्या शरद अहेर यांच्याकडेच कायम ठेवण्यात आली आहे. त्यात आता महापालिकेची निवडणूक लागल्याने व शहराध्यक्षांकडून अन्य पक्षीयांशी ‘सलोखा’ प्रस्थापित केला गेल्याच्या संशयातून जुन्या व निष्ठावंत म्हणवणाऱ्यांनी ऐन निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा पक्षांतर्गत कुरबुरीला तोंड फोडून चव्हाट्यावर आणून ठेवले आहे. शहराध्यक्षांच्या कामकाजाबाबत समाधानी नसलेल्यांनी नुकतीच जी बैठक घेतली त्यात माजी शहराध्यक्ष आकाश छाजेडही सहभागी झाल्याचे दिसून आले. या बैठकीतील लोकांनी ‘समांतर काँग्रेस’ चालविण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर हकालपट्टीसारख्या कारवाईची मागणी पुढे आल्याने सदरचे प्रकरण चिघळले आहे. यापूर्वी अशीच ‘समांतर काँग्रेस’ चालविणाऱ्यांवर कोणी व कोणती कारवाई केल्याचा प्रतिप्रश्न त्यावर केला जात आहे. विशेष म्हणजे, ही या पक्षात अव्याहत चालत आलेली बाब आहे. कालचे ‘समांतर’वाले आज पदांवर आले की ते नरमतात व पदावरून उतरलेले बंडोपंताची भूमिका घेऊन वेगळी चूल थाटताना दिसतात. त्यामुळे या पक्षाला आणखी वेगळ्या विरोधकाची गरजच उरलेली नाही.वस्तुत: महापालिकेच्या निवडणुकीचा विचार करता, शहरातील प्रत्येक प्रभागात २ पुरुष व २ महिला उमेदवार द्यायचे तर माणसे आणायची कुठून, असा प्रश्न काँग्रेसपुढे आहे, इतकी या पक्षाची संघटनात्मक अवस्था बिकट आहे. साधे होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी विभागनिहाय निरीक्षक नेमायचे तर माजी मंत्र्यांसह उमेदवारी करणाऱ्यांनाच निरीक्षक नेमायची वेळ आली. अशा स्थितीत ‘भरती’प्रक्रियेकडे लक्ष देण्याची गरज असताना आहे त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली जाणार असेल तर ती ‘शेखचिल्ली’पणाचीच म्हणायला हवी. कॉँग्रेसला उमेदवार मिळण्याची मारामार लक्षात घेऊनच मध्यंतरी राष्ट्रवादी व समविचारी पक्षांसह ‘आघाडी’ करण्याचे घाटले होते. परंतु राष्ट्रवादीचे नेते एकापाठोपाठ एक वेगवेगळ्या प्रकरणात अडकून कारागृहात गेल्याने ‘अशा’ पक्षासोबत जाऊन आपल्या पायावर कसा धोंडा पाडून घ्यायचा म्हणून ‘आघाडी’च्या पुनर्विचाराचा मुद्दा पुढे आला. समजा खरेच तसे करायचे असेल तर उलट अधिकाधिक कार्यकर्ते वा उमेदवार जोडण्याचे ध्येय ठेवायला हवे. परंतु येथे उलटच होताना दिसत आहे. बरे, पक्षाचे वरिष्ठ नेते दुर्लक्ष करत आहेत आणि त्यामुळे स्थानिक धुरिणांना पक्ष पुढे नेण्यात अडचणी येत आहे अशातलाही भाग नाही. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व आमदार भाई जगताप यांच्यापासून पक्ष निरीक्षकांपर्यंतचे नेते येथे येऊन वेळोवेळी मार्गदर्शन करून जात असतात. पण, शिलेदारच थंड म्हटल्यावर पक्ष कसा उभा राहणार? मध्यंतरी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी एका मेळाव्यात बोलताना काँग्रेसने आपली विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे बजावताना लोकांचा आवाज बनण्यासाठी दर आठवड्याला काही ना काही कार्यक्रम, आंदोलन करण्याची सूचना केली होती. वर्तमान राजकीय परिस्थिती पाहता विरोधक म्हणून आंदोलने करायला अनेकविध मुद्देही उपलब्ध आहेत. परंतु जेथे काँग्रेसच्या बैठकांना पुरेसा ‘कोरम’ भरू शकत नाही तेथे आंदोलन-उपक्रमात कोण सहभागी होणार या भीतीतून कसली सक्रियताच दाखविली जात नाही. त्यामुळे या पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आल्यासारखी स्थिती आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, पक्षाच्या या पडत्या काळात किमान मार्गदर्शकाची भूमिका बजावून तरुणांना पक्ष सावरण्याचे व त्यांच्यातील उमेद जागवण्याचे कार्य ज्यांनी करायचे असे अनेक ज्येष्ठ नेते पक्षाकडे असताना ते मात्र हाताची घडी घालून गंमत पाहात आहेत. पक्षातर्फे खासदारकी व राज्यमंत्रिपद भूषविलेले तसेच विधानसभेत निवडून जाऊ शकले नाहीत म्हणून विधान परिषदेत संधी दिले गेलेले असे अनेक नेते आहेत. एक माजी मंत्री तर अन्य राजकीय पक्षांच्या व्यासपीठांवर जाऊन ज्येष्ठत्वाच्या अधिकाराने मार्गदर्शन करीत असतात; पण यापैकी कुणीही काँग्रेस कमिटीत येऊन चुकणाऱ्यांचा कान धरताना किंवा बोट धरून काही शिकवताना - समजावताना दिसत नाही. त्यामुळेच काँग्रेसमधील ‘निर्नायकी’ नजरेत भरून जाणारी ठरली असून, पक्षाच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष न पुरविल्यास कपाळमोक्ष निश्चित आहे.