'फोडा आणि राज्य करा, यावर काँग्रेसचा विश्वास', संजय निरुपम यांची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 03:49 PM2024-04-22T15:49:35+5:302024-04-22T15:50:36+5:30
'देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी राजकारणासाठी देशाचे दोन तुकडे केले.'
मुंबई:काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. पक्ष सोडल्यापासून ते सातत्याने काँग्रेसवर (Congress) टीका करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसला मतदान न करण्याचे आव्हान केले होते. त्यानंतर आता त्यांनी देशाच्या फाळणीला काँग्रेस जबाबदार असल्याची गंभीर टीका केली आहे.
जाहीरनाम्यावरुन वाद; मल्लिकार्जुन खरगेंनी पीएम नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी मागितली वेळ
देशाच्या फाळणीला काँग्रेस जबाबदार
एएनआयशी बोलताना निरुपम म्हणतात, 'काँग्रेसचा सुरुवातीपासूनच फोडा आणि राज्य करा, यावर विश्वास आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी राजकारणासाठी देशाचे दोन तुकडे केले. फाळणीला सर्वस्वी काँग्रेसच जबाबदार आहे. आजही त्यांचा नेता भर सभेत लोकांना त्यांची जात विचारतो. लोकांना जाती-धर्मात वाटणे काँग्रेसची जुनी सवय आहे. त्यावर आता देशातील लोक नाराज आहेत आणि त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसते.'
#WATCH | Former Congress leader Sanjay Nirupam says, "From the very beginning, Congress has believed in divide and rule... When the country became independent, it was divided into two for politics. Congress is responsible for the partition. In a crowd, their leader randomly asks… pic.twitter.com/oUsELf9bmf
— ANI (@ANI) April 22, 2024
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कम्युनिस्ट मानसिकता
यावेळी निरुपम यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, 'काँग्रेसचा जाहीरनामा कुणीही वाचत नाही. यावेळी त्यांच्या जाहीरनाम्यात कम्युनिस्ट मानसिकतेचा मोठा प्रभाव दिसून येतोय. त्यांनी लोकांची संपत्ती जप्त करुन, त्याचे वाटप केले जाईल, असे म्हटले. एका विशिष्ट धर्मासाठी काँग्रेस इतरांशी भेदभाव करेल. यावरुनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात टीका केली होती. मल्लिकार्जुन खर्गेना तर स्मृतिभ्रंश झाला आहे. अशी व्यक्ती आपल्या पंतप्रधानांसारख्या अगदी तंदुरुस्त व्यक्तीसोबत बसून चर्चा कशी करू शकते? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
काँग्रेसला मतदान करु नका
दोन दिवसांपूर्वीच, म्हणजेच 19 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. यावेळी संजय निरुपम यांनी देशातील मतदारांना काँग्रेसला मतदान न करण्याचे आवाहन केले होते. माध्यमांशी बोलताना निरुपम म्हणाले होते की, 'मी मतदारांना भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना मतदान करण्याचे आवाहन करू इच्छितो. काँग्रेसला मतदान करुन आपली मते वाया घालवू नका. काँग्रेस एक जुनी इमारत आहे, जी जुने आणि थकलेले नेते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते स्वतःची परिस्थिती बदलू शकत नाहीत, तर देशाची परिस्थिती काय बदलणार', अशी टीकाही त्यांनी केली होती.