अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंदिरांमध्ये दर्शनाला जाण्याचा धडाका लावला होता. भाजपाने राहुल गांधींच्या या मंदिर भेटीला धार्मिक रंग देऊन काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी आता मंदिरांमध्ये दर्शनाला जात आहेत पण ते उत्तर प्रदेश निवडणुकीच्यावेळी अयोध्येत राम मंदिरात का गेले नाहीत ? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता.
पण आता निवडणुकीच्या निकालावर नजर टाकली तर राहुल गांधींच्या या टेम्पल रनचा काँग्रेसला जागांच्या रुपाने आशीर्वाद मिळाल्या दिसत आहे. द्वारकाचा अपवाद वगळता राहुल गांधींनी ज्या मंदिरांना भेट दिली त्या विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत. राहुल गांधींनी संपूर्ण गुजरातमध्ये एकूण 27 मंदिरांना भेट दिली त्यातील 18 मतदारसंघांमध्ये काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत. द्वारकेतील द्वारकाधीश मंदिरापासून राहुल गांधींच्या ''टेम्पल रनला'' सुरुवात झाली होती. पण द्वारकेतून भाजपाचे पाबूभा मानेक सलग सातव्यांदा विजयी झाले.
राहुल गांधींनी अंबाजी मंदिर (दंता), बहुचराजी माता मंदिर (बेचरजी), चामुंडा माता मंदिरा (चटिला), स्वामिनारायण मंदिर (गाधाडा), अक्षरधाम मंदिर ( उत्तर गांधीनगर), वीर माया मंदिर (पाटण), सोमनाथ मंदिर, उमिया माता मंदिर (ऊँझा), शामलाजी मंदिर (भिलोडा), रणछोडजी मंदिर डाकोर (थासरा), कबीर मंदिर (दाहोड), रणछोडजी मंदिर (पेटलाड), उनाय माता मंदिर (वनसदा), खोदीयार माता मंदिर आणि सदाराम बापा मंदिर (राधनपूर), देव मोग्रा माता मंदिर (देदीयापाडा) आणि वलिनाथ मंदिर ( वाव) या मंदिरांना भेट दिली. ही मंदिर ज्या मतदारसंघांमध्ये आहेत तिथे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले.
राहुल गांधींच्या ''टेम्पल रन''मध्ये काँग्रेसने आता ज्या 18 जागा जिंकल्या आहेत त्यातील 10 जागा 2012 मध्ये भाजपाने जिंकल्या होत्या. राहुल गांधींनी या टेम्पल रनमध्ये शेवटची भेट दिली ते अहमदाबादमधल्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराला. शहर पोलिसांनी रोड शो ला परवानगी नाकारली तेव्हा राहुल जगन्नाथ मंदिरात गेले. तिथे सुद्धा जमालपूर-खादिया मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार विजयी झाले.