Congress Bharat Jodo Nyay Yatra (Marathi News) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील 'भारत जोडो न्याय यात्रा' बिहारमधून पुन्हा पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली. यादरम्यान बुधवारी(दि.31) पश्चिम बंगालमधील मालदाच्या हरिश्चंद्रपूर भागात राहुल यांच्या कारवर हल्ला झाला. या घटनेत राहुल यांच्या गाडीवर दगडफेकही करण्यात आली. सुदैवाने त्यांना काही झाले नाही, पण कारच्या काचा फोडण्यात आल्या. या घटनेनंतर ते बसमध्ये बसून निघून पुढे गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहार-पश्चिम बंगालच्या सीमेवर भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींच्या कारवर दगडफेक करण्यात आली. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी तृणमूलवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या घटनेत वाहनाच्या मागील खिडकीची काच फुटली आहे. सुदैवाने राहुल गांधींना दुखापत झाली नाही. जमावातून कोणीतरी मागून दगडफेक केली. घटना मोठी नाही, काहीही होऊ शकले असते, असे अधीर रंजन म्हणाले.
बिहारमधून पश्चिम बंगालमध्ये दाखल होत असताना मालदाच्या हरिश्चंद्रपूरमध्ये हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी राहुल गांधी यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूलमधील संबंध बिघडले असताना हा हल्ला झाला. त्यामुळे आता राजकारण तापले आहे.