Congress Bharat Jodo Nyay Yatra:काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या असाममध्ये आहे. या यात्रेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप कार्यकर्त्यांनी या यात्रेत घुसून मोदी-मोदी आणि जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. काल(दि.22) राहुल गांधींना मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली. त्यानंतर आता मंगळवारी(दि.23) काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
काँग्रेसच्या यात्रेला शहरात बंदीमिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक कोडींच्या कारणास्तव भारत जोडो यात्रेला गुवाहाटी शहरात येण्यास बंदी घालण्यात आली होती. तरीदेखील खानापारा येथील गुवाहाटी चौकात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्याने चौकात मोठी गर्दी झाली. कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात राहुल गांधी यांचे स्वागत केले आणि शहरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांना पुढे जाण्यापासून रोखले, लाठीचार्जही केला. या दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेशया घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आसाम पोलिसांना दिले आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना मुख्यमंत्र्यांनी हे आसामी संस्कृतीचा भाग नसल्याचे म्हटले आहे. आमचे शांतताप्रिय राज्य आहोत. अशाप्रकारचे नक्षलवादी डावपेच आमच्या संस्कृतीपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. राहुल गांधींमुळे गुवाहाटीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे मी पोलिसांना राहुल गांधी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.