Congress Bharat Jodo Yatra 2.0: आगामी लोकसभा निवढणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करणार आहेत. पहिल्या टप्प्यात दक्षण-उत्तर भारत झाल्यानंतर आता पूर्व-पश्चिम, अशी ही यात्रा असेल. काँग्रेसचे अनेक नेते लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींकडे भारत जोडो यात्रेची वारंवार मागणी करत आहेत. त्यामुळे लवकरच ही यात्रा सुरू होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षातील मागणीनंतर 21 डिसेंबर रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची मागणी केली. राहुल गांधी यांनीदेखील या यात्रेला सहमती दर्शवली आहे, मात्र याच बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केवळ पदयात्रेऐवजी यात्रेचा दुसरा टप्पा नव्या स्वरूपात करण्याचा सल्ला सर्व नेत्यांनी दिला.
यावेळी भारत जोडो यात्रा पूर्वेकडून (अरुणाचल प्रदेश) पश्चिमेकडे (गुजरात) होईल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओडिशा, बिहार, बंगाल, झारखंड, यूपी, गुजरात या ईशान्येकडील राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. मोर्चा किंवा महत्त्वाच्या कार्यक्रमांपूर्वी पदयात्रा असेल, त्यानंतर बस, सायकल, दुचाकी तसेच ट्रॅक्टर, ट्रक यांचा वापर केला जाईल. कमी वेळात अधिक कार्यक्रमांचे आयोजन करता यावे, हा यामागचा उद्देश आहे.
जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून भारत जोडो यात्रा सुरू करून मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापर्यंत 60 दिवसांत पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. इंडिया आघाडीची एकजूट दाखवण्यासाठी यात्रेत विविध पक्षांचे नेते सहभागी होऊ शकतात. अरुणाचलच्या परशुराम कुंडापासून यात्रेची सुरुवात होऊन, महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमात समाप्ती होईल, अशी माहिती मिळत आहे.