नई दिल्ली: काँग्रेसने कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत 'भारत जोडो यात्रा' काढली, त्यानंतर आता काँग्रेस आता देशाच्या पूर्व भागातून पश्चिम भागापर्यंत यात्रा काढण्याच्या विचारात आहे. अरुणाचल प्रदेशातील पासीघाट ते गुजरातमधील पोरबंदरपर्यंत ही यात्रा काढली जाण्याची शक्यता आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ही माहिती दिली आहे.
संबंधित बातमी- 'ते सत्तेसाठी काहीही करतील, आम्ही सत्याने लढू आणि जिंकू...' राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल
जयराम रमेश म्हणाले की, पूर्वेकडून पश्चिमेचा प्रवास दक्षिण-उत्तर प्रवासापेक्षा वेगळा आहे. ईशान्येकडील भौगोलिक आणि हवामानाचा विचार करता यात्रेसाठी वाहतुकीची वेगवेगळी साधने (मल्टी-मॉडल) वापरली जाऊ शकतात. पहिल्या यात्रेच्या तुलनेत या यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी असू शकते. येत्या काही आठवड्यांत सर्व काही ठरवले जाईल, असे ते म्हणाले.
याआधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या अधिवेशनात भाषण करताना या यात्रेबाबत संकेत दिले होते. राहुल गांधी म्हणाले की, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही तपस्या पुढे नेण्यासाठी एक कार्यक्रम तयार करावा, यामध्ये प्रत्येकजण सहभागी होण्यास तयार आहे. राहुल यांनी या यात्रेला अनेकदा तपश्चर्याचे नाव दिले आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात काँग्रेसची यात्रा काढली जाऊ शकते, अशी शक्यता आहे.