Congress Bharat Jodo Yatra:काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सध्या हरियाणातून जात आहे. हरियाणातून यात्रा पंजाबमध्ये दाखल होईल. राहुल गांधी (Rahul Gandhi) या यात्रेचे नेतृत्व करत आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधींनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल म्हणाले, "दक्षिणेतील राज्यांमध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातही चांगला प्रतिसाद मिळाला. भाजपवाले म्हणायचे की, हिंदी पट्ट्यातील लोकांचा पाठिंबा मिळणार नाही आणि यात्रा फ्लॉप ठरेल, पण तसे झाले नाही."
राहुल गांधी पुढे म्हणाले, "भारतात भीती पसरवली जात आहे, दोन धर्मामध्ये भांडण लावले जात आहे. या प्रवासाकडे आम्ही तपश्चर्या म्हणून पाहत आहोत. आम्हाला गरीब जनतेसोबत चालायचे आहे. यात्रेद्वारे आम्ही कुठल्याही राजकीय फायद्याचा विचार करत नाही आहोत. सध्या भारतात आर्थिक भेदभाव होत आहे. मीडिया आणि अनेक संस्था दोन-चार लोकांच्या हातात आहेत. याविरोधात ही यात्रा आहे,'' असंही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "आमचे लक्ष्य फक्त यात्रा आहे आणि जनतेचे मन वळवण्याचा प्रयत्न करणे आहे. सध्या देशातील जनतेमध्ये फूट पाडून त्यांच्यात द्वेष पसरवला जात आहे. काँग्रेसने कधी म्हटले आहे का की एका धर्माने दुसर्या धर्माशी लढावे? सध्या देशात भीतीचे वातावरण आहे. याच विरोधात आमची ही यात्रा होत आहे,'' असेही राहुल म्हणाले.
या महिन्यात यात्रेचा समारोप'भारत जोडो यात्रा' 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झाली. या महिन्यात 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये राहुल गांधी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून यात्रेचा समारोप होईल. ही पदयात्रा आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधून गेली आहे.