Bharat Jodo Yatra: 2019 मध्ये पाकिस्तानस्थित दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी हल्ल्यात 40 CRPF जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर इंडियन आर्मीने पाकिस्तानात जाऊन सर्जिकल स्ट्राईक केली होती. तेव्हा काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी याला खोटं सांगून पुरावा मागितला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसने सर्जिकल स्ट्राईकला खोटं म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी केंद्र सरकारला फटकारलं. 'भाजपवाले सर्जिकल स्ट्राइकबद्दल बोलतात, पण पुरावा देत नाहीत' असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
सोमवारी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेच्या जम्मू टप्प्यात आली आहे. यावेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी बोलताना सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, दिग्विजय सिंह म्हणाले की, 'केंद्र सरकारने सर्जिकल स्ट्राईक किंवा पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा कोणताही अहवाल आजपर्यंत संसदेसमोर ठेवला नाही. ते म्हणतात की, आम्ही इतके लोक मारले. पण पुरावा देत नाहीत. खोटं बोलून राज्य करत आहेत' असं विधान त्यांनी केलं.
दिग्विजय सिंह पुढे म्हणाले, 'पुलवामामध्ये आमचे 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले. सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी पीएम मोदींना विनंती केली होती की जवानांना एअरलिफ्ट करावं, पण पीएम मोदींनी ते मान्य केलं नाही. इतकी मोठी चूक कशी झाली? आजपर्यंत पुलवामाबाबत कोणताही अहवाल संसदेसमोर मांडण्यात आलेला नाही. उरी दहशतवादी हल्ल्याच्या सुमारे 10 दिवसांनंतर 2016 मध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्यात आली. सरकारनं सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केला, पण पुरावा दाखवला नाही,' असंही ते म्हणाले.