Modi Govt Advertisement Expenses: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेला आतापर्यंत प्रचंड प्रतिसाद मिळत असून, ज्या राज्यात ही यात्रा जाते, तेथे मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले जात आहे. यातच हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळवता आल्यामुळे पक्षाचे बळ वाढले आहे. यातच केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी काँग्रेस सोडताना दिसत नाही. यातच आता २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून आतापर्यंत मोदी सरकारने जाहिरातींवर केलेल्या खर्चावरून काँग्रेसने निशाणा साधला आहे.
काँग्रेसने एक ट्विट केले असून, यामध्ये मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ६ हजार ५०० कोटी! मोदी सरकारने सन २०१४ ते आतापर्यंत जाहिरातींवर ६ हजार ५०० कोटी रुपये खर्च केले आहेत, असे सांगत मोदींना हवे असते तर जाहिरातींवर त्यांनी त्यांचे फोटो छापले असते पण त्यांनी फक्त यासाठी ६ हजार ५०० रुपये खर्च केले आहेत, असा खोचक टोला काँग्रेसने लगावला आहे.
२०१४ पासून स्वत:चीच पाठ थोपटण्याचा खर्च ६५०० कोटी रुपये
काँग्रेसने एक फोटोही शेअर केला आहे. यातूनही काँग्रेसने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. अन्य एका ट्वीटमध्ये काँग्रेसने पंतप्रधान मोदी स्वत:चीच पाठ थोपटून घेत आहेत. केवळ ६५०० कोटी… २०१४ पासून स्वत:चीच पाठ थोपटण्याचा खर्च ६५०० कोटी रुपये, असे काँग्रेसने फोटो शेअर करत म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"