नवी दिल्ली : काँग्रेसकडून 12 मार्च रोजी आतापर्यंतची सर्वात मोठी दांडी यात्रा गुजरातमध्ये आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या यात्रेत सहभागी होणार आहे. तर दिल्लीतील घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांविरूद्ध गांधीजींच्या अहिंसेचा संदेश ते यावेळी देणार आहेत.
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी 12 मार्च 1930 रोजी दांडी यात्रा सुरू केला होती, ती 6 एप्रिल 1930 रोजी संपली होती. बापूंच्या या ऐतिहासिक दांडी यात्रेला यंदा 90 वर्षे पूर्ण होत आहे. त्याप्रमाणे काँग्रेसकडून दांडी यात्रा काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसकडून 12 मार्च रोजी काढण्यात येणारी दांडी यात्रा अहमदाबाद येथील साबरमती येथून सुरु होणार असून, 6 एप्रिल पर्यंत चालणार आहे. ही यात्रा 27 दिवसात 386 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. तर या 27 दिवसाच्या प्रवासात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी सहभागी राहणार आहे.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, दांडी यात्रेच्या शेवटच्या दिवशी सोनिया गांधी आणि राहुल गांधी जाहीर सभेला संबोधित करू शकतात. यात सर्व काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री, काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख उपस्थित असतील.