नवी दिल्ली : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत विजयी होण्याचा विश्वास भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना आहे. तथापि, भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी.एस. येदीयुरप्पा यांनी असा दावा केला आहे की, त्यांचा पक्ष १२५ ते १३० जागा जिंकेल. काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटले आहे की, एक्झिट पोलच्या अंदाजाबाबत काळजी न करता कार्यकर्त्यांनी विकेंडचा आनंद घ्यावा. सिद्धरामय्या यांनी व्टिट केले आहे की, ‘विकेंडचा आनंद घ्या, आम्ही पुन्हा परत येत आहोत.’कर्नाटकातील मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलची चर्चा सुरु झाली असली तरी नागरिकांसाठी हे मनोरंजन ठरत आहे. भाजपचे नेते येदीयुरप्पा यांनी असा दावा केला आहे की, भाजपला १३० पर्यंत जागा मिळतील. तर, काँग्रेस ७० च्या पुढे जाणार नाही. जनता दलाला (एस) २४-२५ च्या पुढे जागा मिळणार नाहीत. भाजपच्या बाजूने राज्यात लाट होती. तर, सिद्धरामय्या यांच्या विरोधात नागरिकातून संताप व्यक्त होत होता. आम्हाला विजयाची खात्री आहे आणि १७ मे रोजी सरकार स्थापन करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.एक्झिट पोलनुसार, जनता दल (एस) किंंगमेकरच्या भूमिकेत राहणार आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते एच. डी. देवेगौैडा म्हणाले की, सद्या कशाचाच स्वीकार किंवा अस्वीकार करता येणार नाही. लोकांनी निकालाच्या दिवसापर्यंत प्रतीक्षा करावी. १५ मे रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी वस्तुस्थिती समोर येणार आहे.ही माझी शेवटची निवडणूक : सिद्धरामय्याकर्नाटकात काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त करतानाच ही आपली शेवटची निवडणूक होती, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले आहे. चामुंडेश्वरी मतदारसंघात पत्रकारांशी ते बोलत होते.दलित मुख्यमंत्र्यांच्या शक्यतेबाबत प्रश्न केला असता ते म्हणाले की, जर पक्ष दलित मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेत असेल तर उत्तमच आहे. ते म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेस पूर्ण बहुमताने सत्तेवर येईल. तसेच, जनता दल (एस) सोबत आघाडी करण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली.एक्झिट पोलचे अंदाज फेटाळून लावताना ते म्हणाले की, एक्झिट पोल दोन दिवसांसाठी मनोरंजन आहे. यावर विश्वास ठेवणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला पोहता येत नसताना सांख्यिकीशास्त्रज्ञावर विश्वास ठेऊन पायी नदी पार करण्यासारखे आहे.निवडणुकीत प्रमुख चेहरे झाले गायबकर्नाटकातील निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांनी प्रचार केला असला तरी, या निवडणुकीपासून काही चेहरे मात्र अलिप्त दिसून आले. केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज या प्रकृतीच्या कारणास्तव प्रचारात सहभाग घेऊ शकल्या नाहीत. तथापि, अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी आणि केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांना राज्यात प्रचारासाठी आमंत्रित करण्यात आले नाही. काँगे्रसच्या सोशल मीडियाच्या प्रमुख आणि अभिनेत्री रम्या निवडणूक प्रचारात दिसल्या नाहीत.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपचे अन्य काही नेते स्टार प्रचाराच्या यादीत समाविष्ट होते. पण, तेही प्रचारात दिसले नाहीत.
काँग्रेस-भाजपालाही विजयाचा विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 2:27 AM