कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू आझाली आहे. दक्षिणेतील महत्त्वाचं राज्य असलेल्या कर्नाटकमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. येथे काँग्रेसने सत्ताधारी भाजपाला जोरदार टक्कर दिली होती. तसेच विविध कलचाचण्यांमधूनही काँग्रेस आघाडीवर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत होताना दिसत आहेत.
२२४ जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेमध्ये बहुमताचा आकडा ११३ एवढा आहे. दरम्यान, सुरुवातीच्या कलांमध्ये कधी भाजपा, तर कधी काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसत आहे. दरम्यान, सकाळी ९ वाजेपर्यंतच्या कलांमध्ये काँग्रेस १०४ भाजपा ९८, जेडीएस १९ एवढ्या जागांवर आघाडीवर आहेत. मात्र मतमोजणीदरम्यान, कधी काँग्रेसचा मोठी आघाडी मिळत आहे. तर कधी भाजपा पिछाडी भरून काढत काँग्रेसला गाठत आहे. त्यामुळे निकालांबाबत उत्सुकता वाढली आहे.
कर्नाटकात २२४ जागांसाठी एकूण २६१५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. विशेष म्हणजे कर्नाटकात दर ५ वर्षांनी सरकार बदलण्याचा ट्रेंड गेल्या ३८ वर्षापासून सुरू आहे. हा ट्रेंड मोडणार का याकडे आज संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
२०१८ मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल त्रिशंकू लागला होता. त्यावेळी भाजपा मोठा पक्ष ठरला होता. मात्र काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देत सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर वर्षभरातच हे सरकार कोसळल्यावर भाजपाने कर्नाटकात पुन्हा सरकार स्थापन केलं होतं.