संजय शर्मा नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी सर्जिकल स्ट्राइकबाबत सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकार सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलते की आम्ही इतके लोक मारले; मात्र त्याचा पुरावा मात्र अद्याप दिलेला नाही. हा प्रश्न उपस्थित केल्याने भाजपला पुन्हा एकदा देशभक्ती आणि सैन्याच्या अपमानाचा मुद्दा मिळाला आहे.
नऊ राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसला घेरण्याचा मोठा मुद्दा दिग्विजय सिंह यांनी भाजपच्या हाती दिला आहे. एका सर्जिकल स्ट्राइकच्या मुद्द्यावर तयार झालेल्या त्सुनामीच्या लहरीवर भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला ५२ जागांवर रोखले होते.
भारत जोडो यात्रेमुळे भाजपमध्ये अस्वस्थताएका आठवड्यानंतर ३० जानेवारीला भारत जोडो यात्रा समाप्त होत आहे. राहुल गांधी यांच्या या यात्रेने देशात तयार झालेले वातावरण आणि यात्रेत होत असलेली गर्दी यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. पुढील महिन्यात त्रिपुरा, मेघालय, नागालँडमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या तीनही राज्यांत भाजपची परिस्थिती चांगली नाही. त्रिपुरात भाजपच्या हातून सत्ता जाऊ शकते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या तीन राज्यांतील भाजप नेत्यांसोबत नुकतीच समीक्षा केली.
वक्तव्यामुळे कोंडीदिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष अस्वस्थ दिसत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पत्रकाराचा माइक दिग्विजय सिंह यांच्या चेहऱ्यासमोरून हटविल्याचे दिसून आले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे तयार झालेल्या वातावरणाचा काँग्रेसला फायदा घ्यायची वेळ आलेली असताना दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यामुळे कोंडी निर्माण झाली आहे.
सैन्याचा पराक्रमावर सवाल नको : भाजप- सिंह यांच्या या वक्तव्यानंतर भाजपमध्ये उत्साह आहे. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर आरोप करीत म्हटले आहे की, त्यांनी सैन्याचा अपमान करणे थांबवावे. - सैन्याचा पराक्रम आणि साहस यावर सवाल करू नयेत. भारतीय सैन्याच्या विरोधात बोलाल तर देश हे सहन करणार नाही.