- महेश खरे अहमदाबाद : राज्यात निवडणूक प्रचारात आपणच गुजरातचे खरे प्रतिनिधी असल्याचे दाखविण्यासाठी भाजपा व काँग्रेसमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. भाषणाचे उत्तर भाषणाने आणि व्हिडीओचे उत्तर व्हिडीओने देत आम्हीच खरे गुजराती आहोत (हूं छूं गुजराती) असे पटवून सांगणे दोन्ही पक्षांतर्फे सुरू आहे.भाजपाने प्रचाराच्या माध्यमातून हूं छूं विकास, हूं छूं गुजराती (मी आहे विकास, मी आहे गुजराती) असा प्रचार व्हिडीओद्वारे चालवला असून, त्याला उत्तर म्हणून काँग्रेसने दोन व्हिडीओ जारी करून हंू छूं पाको गुजराती (मी आहे खराखुरा गुजराती) सांगण्यास सुरुवात केली आहे.भाजपाध्यक्ष अमित शहा कार्यकर्त्याकडे जेवतानाचे छायाचित्र तर राहुल गांधी हे काशाच्या भांड्यात चहा घेत असतानाचे छायाचित्र प्रचारात झळकत आहे. ‘विकासवेडा झाला आहे’ ही विरोधकांची टीकाही सोशल मीडियात चर्चेचा विषय आहे.‘आम्हाला गुजराती असल्याचा गर्व आहे,’ असे भाजपा सांगत आहे. पंतप्रधान मोदी व अमित शहा गुजराती असल्याचा फायदा भाजपा घेऊ पाहत आहे. सप्टेंबरपासून राहुल गांधी आणि मोदी यांच्या अनेक रॅली गुजरातमध्ये झाल्या. पण मोदी गुजरातीत बोलतात, तर राहुल गांधी यांची भाषणे हिंदीतील आहेत.काँग्रेसने एक व्हिडीओ आणला असून, यात वडील आपल्या मुलाला काँग्रेसच्या काळात आयआयएम, आयआयटी यांची स्थापना झाल्याचे सांगताना दिसत आहेत.>हार्दिक यांची पत्रकार परिषद रद्दबोताड विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या निवडीवरून पाटीदार अनामत आंदोलन समितीचे नेते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल यांनी मंगळवारी आपली पत्रकार परिषद रद्द केली आहे. बोताडमधून काँग्रेसने राष्ट्रवादीचे बंडखोर नेते मनहर पटेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण, येथून दिलीप साबवा यांना उमेदवारी द्यावी, अशी पाटीदार समितीची मागणी आहे. काँग्रेसने रविवारच्या यादीत आणखी दोन पाटीदार नेत्यांना उमेदवारी दिली आहे.>समर्थकांना उमेदवारी : पहिल्या यादीनंतर पाटीदार समितीच्या नाराजीमुळे काँग्रसने हार्दिक पटेल यांच्या तीन समर्थकांना उमेदवारी दिली. यात ललित वसोया, अशोक जिरावाला यांचा समावेश आहे.>राजकोट पश्चिममधून उमेदवारी अर्ज दखल करणारे मुख्यमंंत्री विजय रूपाणी यांची संपत्ती ७.५१ कोटींवरून ९.०९ कोटी झाली आहे.>काँग्रेसचे उमेदवार इंद्रनील राज्यगुरू यांच्या संपत्तीत १५ टक्के वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती २०१२मध्ये १२२ कोटी होती. ती आता १४१ कोटी एवढी झाली आहे.>शंभरी ओलांडलेले मतदार : एकट्या अहमदाबादमध्ये १०० वर्षे वा त्याहून अधिक वयाचे ६६२ मतदार आहेत. अहमदाबाद शहर व जिल्ह्यात ९० ते १०० या वयाचे ७,१८१ मतदार आहेत.
गुजरातशी नाते जोडण्यासाठी काँग्रेस-भाजपामध्ये चढाओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 4:15 AM