तेलंगणातील मुलुगू जिल्ह्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी भारतीय राष्ट्र समितीला लक्ष्य केलं. बीआरएसला मत म्हणजे भाजपाला मत असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी, त्यांनी एमआयएम पक्षावरही भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला. राहुल गांधींच्या या आरोपावर आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी प्रत्युत्तर दिलंय. औवेसी यांनी ट्विटरवरुन राहुल गांधींवर निशाणा साधत, तेलंगणात काँग्रेसला २ ते तीन पेक्षा जास्त जागा जिंकता येणार नाहीत, असेच म्हटले आहे.
निवडणूक प्रचारातील अंदाज लावल्याप्रमाणे राहुल बाबांचं बी टीमचं रडगाणं सुरू झालं आहे. त्यांनी स्वत:ची अमेठी सीट भाजपला का गिफ्ट दिली?, जर तेलंगणात भाजपाची ही बी टीम कार्यरत आहे, तर भाजपा इथे कमजोर का आहे? राहुल बाबाला एक सुरक्षित सीट शोधण्यासाठी वायनाडला का जावे लागले?, असा सवाल असदुद्दीन औवेसी यांनी विचारला आहे. तसेच, तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत भाजपा-काँग्रेस आघाडीच्या जेवढे जागा निवडून येतील, त्यापेक्षा जास्त जागा माझ्या रॉयल इन्फिल्डजवळ आहेत, असा खोचक टोलाही औवेसी यांनी लगावला. म्हणजे, भाजप आणि काँग्रेसला केवळ २ ते ३ जागासुद्ध जिंकता येणार नाहीत, असेच औवेसींनी सूचवले आहे.
केसीआर सत्तेची हॅट्ट्रीक करणार?
केसीआर सत्तेची हॅट्ट्रिक करणार, अशी चर्चा आता तेलंगणात होत आहे. २०१३ मध्ये आंध्र प्रदेशपासून वेगळा होऊन तेलंगणा राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून केसीआर यांचे वर्चस्व राहिले आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये प्रचंड बहुमताने सलग दोन निवडणुका जिंकून केसीआर सत्तेवर आहेत. आता, तिसऱ्यांदा विजय नोंदवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सूरू आहे. आत्तापर्यंत केसीआर यांना तेलंगणाच्या ग्रामीण आणि शहरी, दोन्ही भागांतून प्रचंड मतदान मिळाले, परंतु यावेळी त्यांना सत्ताविरोधी लाटेचा सामना राव यांच्या बीआरएस पक्षाला करावा लागणार आहे.
एमआयएमने गतनिवडणुकीत ७ जागा जिंकल्या
असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन तेलंगणातील अनेक भागात मजबुत आहे. हैदराबादमध्ये गेल्या दोन निवडणुकांमध्ये मुस्लिम मतांच्या जोरावर प्रत्येकी सात जागा जिंकण्यात पक्षाला यश आले आहे. ओवेसींच्या पक्षाने हैदराबादच्या जुन्या शहरातील विधानसभा जागांवर विजय मिळवला. अशा स्थितीत किंगमेकर बनण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यासाठी त्यांना मुस्लिम मते आपल्याजवळ ठेवायची आहेत. तेलंगणात एका पक्षाला बहुमत मिळाले नाही, तर आपली भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे त्यांना वाटते. बसपाही ओवेसींच्या पावलावर पाऊल टाकत, दलित समाजाच्या मदतीने किंगमेकर बनण्याचा प्रयत्न करत आहे.