नवी दिल्ली : लोकपाल निवड समितीचा सदस्य म्हणून ‘ख्यातनाम विधिज्ञा’ची निवड करण्यासाठी गुरुवारी व्हायच्या बैठकीस ‘विशेष निमंत्रित’ म्हणून हजर राहण्यासाठी सरकारने दिलेले निमंत्रण लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नाकारले आहे.खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून बैठकीस न येण्याची सविस्तर कारणे दिली. त्यात त्यांनी लोकपाल लागू करण्याची सरकारची प्रामाणिक इच्छा नसल्याचा आरोप केला. तसे नसते तर सरकारने कायद्यात दुरुस्ती केली असती. निवडीत सहभागी होण्याचा अधिकार नसताना नुसते निमंत्रित म्हणून येण्यात काहीच हांशिल नाही, असे खरगे यांनी लिहिले.लोकपाल कायद्यानुसार लोकपालाची निवड पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, सरन्यायाधीश, लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि एक ख्यातनाम विधिज्ञ यांच्या समितीने करायची आहे. यापैकी विधिज्ञ सदस्याची निवड इतर तीन सदस्यांनी करायची आहे. मात्र सध्याच्या लोकसभेत कोणीही अधिकृत विरोधी पक्षनेता नसल्याने लोकपाल कायदा गेली तीन वर्षे केवळ कागदावरच राहिला आहे.मध्यंतरी सरकारने कायद्यात दुरुस्ती करून विरोधी पक्षनेता नसेल तेव्हा लोकसभेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला निवड समितीचा सदस्य करण्याची तयारी केली होती. मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयास तोंड देणे अशक्य झाल्यावर सरकारने लोकसभेतील काँग्रेसच्या नेत्याला ‘विशेष निमंत्रित’ म्हणून बोलावून बैठक घेण्याचे ठरविले.
लोकपाल बैठकीवर काँग्रेसचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 3:18 AM