नवी दिल्ली : नवी दिल्लीत 28 मे रोजी होणाऱ्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर तृणमूल काँग्रेसने बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. यानंतर आता काँग्रेसही या सोहळ्यातून माघार घेऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या हवाल्याने असे वृत्त समोर येत आहे की, काँग्रेसचे नेते अंतर्गत चर्चा करत असून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, सध्या पक्षाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमावर काँग्रेस बहिष्कार टाकू शकते. याबाबत अंतिम निर्णय झाला तर उद्घाटन सोहळ्यात काँग्रेसचा एकही नेता दिसणार नाही. दरम्यान, नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या घोषणेपासून विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
आम आदमी पार्टीनेही मंगळवारी संध्याकाळी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले आहे. पार्टीच्या वतीने अधिकृत निवेदन जारी करून ही माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रपतींना उद्घाटन सोहळ्याला का बोलावले जात नाही? या प्रश्नांच्या आधारे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे पार्टीने म्हटले आहे.
तृणमूल काँग्रेसच्या वतीने राज्यसभा खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, तृणमूल काँग्रेस नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार नाही. तसेच, त्यांनी आपल्या वक्तव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी सर्व काही फक्त 'मी, माझे आणि मी' आहे. संसद भवन ही केवळ इमारत नसून ती परंपरा, मूल्ये, आदर्श आणि नियमांचे प्रतिष्ठान आहे, असे डेरेक ओ ब्रायन म्हणाले.
दरम्यान, 18 मे रोजी लोकसभा सचिवालयातून ही माहिती समोर आली होती की, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. बिर्ला यांनी पंतप्रधान मोदींना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले आहे. ही बातमी समोर आल्यापासून विरोधी पक्षनेते सातत्याने विरोध करत आहेत की, उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदींऐवजी राष्ट्रपतींना का बोलावण्यात आले नाही?