ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - देशातील करप्रणालीत क्रांतिकारी बदल करणाऱ्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या अंमलबजावणीला ऐतिहासिक बनवण्यासाठी मोदी सरकारने कंबर कसली आहे. मात्र काँग्रेसने जीएसटीच्या उदघाटनासाठी शुक्रवारी मध्यरात्री बोलावण्यात आलेल्या संसदेच्या विशेष संयुक्त अधिवेशनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसच्या इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ पक्षप्रवक्ते सत्यव्रत चतुर्वेदी यांनी ही माहिती दिली. दरम्यान काँग्रेसप्रमाणेच तृणमूल काँग्रेसनेही जीएसटीसाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहेत. जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घाई केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्याच्या वेळी संसदेत केलेल्या भाषणाचे ऐतिहासिक महत्त्व कमी होऊ नये म्हणून काँग्रेसने मध्यरात्री होणाऱ्या जीएसटीच्या उदघाटनीय समारोहात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जीएसटीच्या सोहळ्यात सामील न होण्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद म्हणाले," काँग्रेस पक्ष शुक्रवारी होणाऱ्या जीएसटीच्या उदघाटनीय समारंभात सहभागी होणार नाही. मध्यरात्रीच्या वेळी संसेदच्या मध्यवर्ती सभागृहात तीन कार्यक्रम झाले आहेत. 1947 स्वातंत्र्य, 1972 स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव आणि 1997 स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव."
1 जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटीच्या उदघाटनासाठी केंद्र सरकारने 30 जूनच्या मध्यरात्री संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जीएसटीच्या अंमलबजावणीची घोषणा करतील.