ट्रम्प यांच्या शाही मेजवानीवर काँग्रेसचा बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 01:50 AM2020-02-24T01:50:12+5:302020-02-24T06:48:41+5:30
सोनिया गांधींना निमंत्रण नसल्याने निषेध; काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांची सरकारवर टीका
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या मंगळवारी देणार असलेल्या शासकीय मेजवानीस काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना निमंत्रण न दिल्याच्या निषेधार्थ लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनीही निमंत्रण असून, या मेजवानीस न जाण्याचे जाहीर केले.
मेजवानीवर बहिष्कार टाकण्यामागची भूमिका स्पष्ट करताना चौधरी म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व पंतप्रधान मोदी हे जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाहींचे प्रतिनिधी करतात. अनेक गोष्टींसह किमान सौजन्य व शिष्टाचार हे लोकशाहीचे महत्वाचे लक्षण असते.... मोदी अमेरिकेस गेले होते तेव्हा तेथे झालेल्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमास रिपब्लिकन व डेमोक्रॅट््स असे तेथील सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही पक्षांचे लोक उपस्थित होते. पण इथे भारतात मोदींनी लोकशाहीची भाषाच बदलून टाकली आहे. इथे भारत जणू एकट्या मोदींचा असल्याप्र्रमाणे फक्त मोदींचीच शोबाजी सुरु असते... काँग्रेस हा १३४ वर्षांचा जुना पक्ष आहे व आमच्या नेत्याला सर्व लोकशाही देश मान देतात... पण इथे भारतात परकीय पाहुण्यांच्या सन्मानार्थ होणाऱ्या प्रमुख सरकारी कार्यक्रमाला निमंत्रित न केले जाणे हा काँग्रेसचा अपमान आहे. ट्रम्प अहमदाबाद येथील कार्यक्रमाकडे आपल्या निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून पाहात आहेत आणि पंतप्रधान मोदी सरकारी पैसा खर्च करून यास मोठ्या उत्साहाने साथ देत आहेत हे निषेधार्ह आहे, असे सांगून चौधरी म्हणाले, द्विपक्षीय व्यापाराच्या बाबतीत ट्रम्प यांनी मोदींवर याआधीच मात केली आहे. ट्रम्प यांच्या भेटीच्या या जल्लोशाने मोदी भारत अमेरिकेला विकायला निघाल्याचेच चित्र दिसत आहे.
मोगॅम्बोला खुश करण्यासाठी
याआधी शनिवारी चौधरी यांनी ट्रम्प यांची तुलना ‘मि. इंडिया’ या बॉलीवूडच्या चित्रपटातील ‘मोगॅम्बो’ या खलनायकी पात्राशी केली होती व या ‘मोगॅम्बो’ला खुश करण्यासाठी भारत हांजी-हांजी करीत असल्याचे म्हटले होते.
काँग्रेसचे मोदींना अनेक प्रश्न
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्रम्प यांच्या दौºयाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांना उद्देशून अनेक प्रश्न टिष्ट्वटरवरून विचारले. त्यातील काही असे:
‘एच-१ बी व्हिसा’ अधिक कडक करण्याच्या अमेरिकेच्या धोरणाचा सर्वाधिक फटका भारताला बसत असताना मोदी हा व्हिसा सुलभ करण्याचा आग्रह धरणार का?
अफगाणिस्तानमध्ये अमेरिका तालिबानशी समझोता करण्याच्या बेतात आहे. त्यामुळे भारताच्या सुरक्षेला निर्माण होणारे धोके मोदी ट्रम्प यांच्यापुढे मांडणार का?
व्यापाराच्या बाबतीत भारताला दिलेला अग्रक्रमाचा दर्जा ट्रम्प यांनी रद्द केल्याने भारताच्या अमेरिकेसोबतच्या व्यापाराला फटका बसत आहे. मोदी देशाचे हित जपण्यासाठी आग्रह धरणार का?
अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध घातल्याने रुपयात किंमत चुकती करून इराणकडून तुलनेने स्वस्त तेल खरेदी करण्याचा मार्ग बंद झाल्याने भारताला इतर ठिकाणांहून महागडे तेल खरेदी करण्यासाठी नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. मोदी हा विषय ट्रम्प यांच्यासोबतच्या वाटाघाटींमध्ये काढणार का?