निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर इलेक्टोरब बाँडबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध केल्यानंतर काँग्रेसने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. इलेक्टोरल बाँडमधील सविस्तर माहिती प्रकाशित करण्याच्या कामात मोठा घोळ झाला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी केला आहे.
अजय माकन आरोप करताना म्हणाले की, सुप्रीम कोर्टामध्ये स्टेट बँकेने सांगितले होते की, २२ हजार २१७ इलेक्टोरल बाँड काढण्यात आले होते. मात्र एसबीआयच्या संकेतस्थळावर केवळ १८ हजार ८१७ इलेक्टोरल बाँड प्रकाशित करण्यात आलेले आहेत. मोदी सरकार नेमकं कोणाला वाचवायचा प्रयत्न करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एसबीआयने उर्वरित ३३४६ इलेक्टोरल बाँड्सची सविस्तर माहिती का दिलेली नाही, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही अजय माकन यांनी केली.
याबाबत मागणी करताना अजय माकन म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एक तपास समिती स्थापन करण्यात यावी. तसेच भाजपाचं बँक खातं तातडीने गोठवण्यात यावं. काँग्रेसनेही सोशल मीडियावरून अशाच प्रकारची मागणी केली आहे. गुरुवारी जेव्हा यादी प्रसिद्ध झाली तेव्हा २०१८ पासून काढलेल्या एकूण २२ हजार २१७ बाँडचा समावेश होता. मात्र वेबसाईटवर केवळ १८ हजार ८७१ बाँड्स प्रसिद्ध करण्यात आले आहेत. उर्वरित ३३४६ बाँड्सची सविस्तर माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. एसबीआयने ती उपलब्ध करून दिलेली नाही.
ते कोण कोण लोक आहेत ज्यांना मोदी सरकार वाचवायचा प्रयत्न करत आहे, असा प्रश्न अजय माकन यांनी विचारला आहे. तसेच याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. तपासामध्ये आयटी आणि ईडीकडून टाकण्यात येणाऱ्या छाप्यांच्या कारवाईलाही इलेक्टोरल बाँड्सशी जोडलं गेलं पाहिजे. इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून देणग्या देणाऱ्या बहुतांश कंपन्यांवर ईडी किंवा आयटीने धाडी टाकलेल्या आहेत. त्या कंपन्यांनी भाजपाच्या दबावामध्ये इलेक्टोरल बाँड्स खरेदी केले आहेत, असा दावाही माकन यांनी केला आहे. आमच्या दोन प्रमुख मागण्या आहेत. एक म्हणजे या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हायला पाहिजे आणि दुसरी म्हणजे भाजपाची बँक खाती त्वरित गोठवली गेली पाहिजेत, असे माकन म्हणाले.