नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांची सोमवारी ईडीने आठ तास चौकशी केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली आहे. नवी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर पक्षाचे नेते आणि समर्थक मोठ्या संख्येने जमले आहेत. यावेळी राहुल यांच्या समर्थकांनी सत्यमेव जयते असे फलक हातात घेतलेले दिसले. दिल्ली पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. याच दरम्यान युवा काँग्रेसचे प्रमुख श्रीनिवास बी व्ही यांनी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना चकमा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.
श्रीनिवास बी व्ही पळून जातानाचा व्हि़डीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. भाजपाच्या काही नेत्यांकडून हा व्हिडीओ शेअर करण्यात येत असून मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. व्हिडीओमध्ये एक पोलीस अधिकारी श्रीनिवास यांना गाडीतून घेऊन येतात. गाडी जेव्हा थांबवतात. तेव्हा पोलीस काँग्रेसच्या नेत्याला खाली उतरवतात. तेव्हाच ते चकमा देऊन पळून जाताना दिसतात. सध्या या व्हि़डीओची जोरदार चर्चा रंगली असून भाजपाने तर टीकेची झोड उठवली आहे.
काँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी तपास यंत्रणेच्या कार्यालयावर मोर्चा काढून सत्याग्रह केला. यावेळी सत्ताधारी सरकार रावणाची भूमिका बजावत असल्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितलं. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, राहुल गांधी आमचे राम आहेत आणि आम्ही त्यांचे भक्त आहोत. राहुल गांधी ईडी कार्यालयातून बाहेर पडेपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवू असं म्हटलं होतं. राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोमवारी चौकशी करण्यात आली. सकाळच्या सुमारास राहुल गांधी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते. . याच दरम्यान "फक्त काँग्रेस नेत्यांनाच इथे बोलवलं जातं का? असा थेट सवाल ईडी राहुल गांधींनी अधिकाऱ्यांना विचारला आहे.
"फक्त काँग्रेस नेत्यांनाच इथे चौकशीसाठी बोलवलं जातं का?"
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल यांनी तपास अधिकाऱ्यांना त्यांचे नाव आणि हुद्द्याबाबत विचारलं. यासोबत त्यांनी ईडी कार्यालयात फक्त काँग्रेस नेत्यांचीच चौकशी केली जाते की तुम्ही दुसऱ्यांनाही चौकशीसाठी बोलवता? असा प्रश्न ईडी अधिकाऱ्यांना विचारला आहे. राहुल गांधींच्या या प्रश्नावर कोणत्याच अधिकाऱ्याने उत्तर दिलं नाही. सोमवारी सकाळी सुरुवातीला त्यांची तीन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर लंच ब्रेकदरम्यान राहुल गांधी सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर ते पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात पोहोचले आणि पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात तब्बल साडेपाच तास त्यांची चौकशी करण्यात आली.