गेल्या ९ वर्षांपासून केंद्रातील सत्तेपासून बाहेर असलेला काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहे. काँग्रेसच्या या सत्तामार्गात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे मोदी आणि भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी विरोधी पक्षांचं ऐक्य घडवून आणून त्या माध्यमातून सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र हे विरोधी पक्षाचं ऐक्य वास्तवात आल्यास त्यासाठी काँग्रेसला मोठा त्याग करावा लागण्याची शक्यता आहे. कारण मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्ष एकत्र आल्यास काँग्रेसला लोकसभेच्या अनेक राज्यांत आपले उमेदवार उतरवता येणार नाहीत, तसेच अनेक राज्यांमधून पूर्णपणे माघार घ्यावी लागेल.
देशातील १० राज्ये अशी आहेत जिथे काँग्रेसची सत्ता नाही आहे. यामध्ये दिल्ली, पंजाब, केरळसारखी राज्ये आहेत. उत्तर प्रदेशमधील ८० जागांवर सपा आणि आरएलडी, बिहारमधील ४० जागंवर जेडीयू आणि आरजेडी, महाराष्ट्रातील ४८ जागांवर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, पश्चिम बंगालमधील ४२ जागांवर तृणमूल काँग्रेस, तामिळनाडूतील ३९ जागांवर डीएमके, केरळच्या २० जागांवर सीपीआय (एम), जम्मू काश्मीरच्या सहा जागांवर पीडीपी आणि नॅशनल कॉन्फ्रन्स, झारखंडच्या १४ जागांवर झारखंड मुक्ती मोर्चा, पंजाबच्या १३ जागांवर आणि दिल्लीच्या ७ जागांवर आपकडून अधिकाधिकी दावेदारी केली जाईल. या राज्यांमध्ये लोकसभेच्या तब्बल ३०९ जागा आहेत.
त्यामुळे स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेसकडे केवळ २३३ जागाच शिल्लक राहतील. त्यामध्ये काँग्रेस अरुणाचल प्रदेशमधील २, आसाममधील १४, आंद्र प्रदेशमधील २५, तेलंगाणामधील १७, चंडिगडमधील १, छत्तीसगडमधील ११, दादरा नगर हवेलीतील १, दमण दिवची १, गोव्याच्या २, गुजरातच्या २६, हरियाणातील १०, हिमाचल प्रदेशमधील ४ कर्नाटकमधील २८, मध्य प्रदेशमधील २९, मणिपूरच्या २, मेघालयच्या २, मिझोराममधील १, नागालँडमधील १, ओडिशामधील २१, पाँडेचेरीतील १, राजस्थानमधील २५, सिक्कीममधील १, त्रिपुरामधील २ आणि उत्तराखंडमधील ५ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवू शकतो.