नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरुनही सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपाला मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एबीपी न्यूज आणि सीएसडीएस-लोकनितीनं संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारी भाजपासाठी चिंताजनक आहे. यंदाच्या वर्षाच्या अखेरीस राजस्थान आणि मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाला मोठा फटका बसणार असल्याचा अंदाज सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. राजस्थानमध्ये भाजपाला मिळणारा पाठिंबा कमी होताना दिसतो आहे. विधानसभा निवडणुकीत 39 टक्के मतं मिळतील, असा सर्वेक्षणाचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 44 टक्के आणि अन्य पक्षांना 17 टक्के मतं मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2013 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 45.17 टक्के मतं मिळाली होती. तर काँग्रेसला 33.07 टक्के मतं मिळाली होती. याशिवाय अन्य पक्षांना 21.76 टक्के मतदान झालं होतं. 200 मतदारसंघ असलेल्या राज्यस्थानमध्ये सध्या भाजपाचे तब्बल 163 आमदार आहेत. मध्य प्रदेशातही भाजपाचं मोठं नुकसान होताना दिसत आहे. सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार मध्य प्रदेशात भाजपाला 34 टक्के, तर काँग्रेसला तब्बल 49 टक्के मतं मिळतील. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 44.88 टक्के, तर काँग्रेसला 36.38 टक्के मतं मिळाली होती. एकूण 230 जागा असलेल्या मध्य प्रदेशात सध्या भाजपाचे 165, तर काँग्रेसचे 58 आमदार आहेत. एबीपी न्यूज आणि सीएसडीएस-लोकनितीनं 28 एप्रिल 2018 ते 17 मे 2018 दरम्यान हे सर्वेक्षण केलं होतं.
राजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 6:18 PM