नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यासाठी आता केवळ काही तासांचा अवधी उरला आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएची सत्ता कायम राहण्याचे संकेत मिळत असले तरी त्रिशंकू लोकसभेची शक्यता गृहित धरून काँग्रेसने संभाव्य मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पुरेसे संख्याबळ न मिळाल्यास पंतप्रधानपदाची संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याने प्रादेशिक पक्षांच्या एखाद्या नेत्याला पाठिंबा देण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसकडून मायावतींच्या नावाला पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता आहे. केंद्रात विरोधी पक्षांच्या आघाडीचे सरकार स्थापन होण्याची वेळ आल्यास काँग्रेसच्या वाट्याला पंतप्रधानपद येण्याची शक्यता फार धुसर आहे. अशा परिस्थितीत मायावती, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, शरद पवार आदी प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची नावे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असतील. मात्र या नेत्यांपैकी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या नावाला काँग्रेसकडून झुकते मात मिळण्याची शक्यता आहे. मायावती या आपल्या सभांमधून काँग्रेसवर सातत्याने टीका करत असतात. मात्र असे असले तरी मायावती यांच्याशी असलेले सुसंबंध कायम ठेवण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. त्याचे कारण म्हणजे मायावतींना पंतप्रधान केल्यास देशातील एक चतुर्थांश दलित समाजामध्ये काँग्रेसबाबत सकारात्मक संदेश जाऊ शकेल. ही बाब गृहित धरून काँग्रेसने मायावतींना तसे संकेतही दिले आहेत.
मात्र काँग्रेसचा कल मायावतींकडे झुकत असल्याचे पाहून ममता बॅनर्जी सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीला अनुपस्थित राहू शकतात. मतमोजणी दिवशी आपल्या राज्यात राहणे अधिक आवश्यक आहे, असे ममता बॅनर्जींचे मत आहे. दरम्यान, मायावती आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम चंद्राबाबू नायडू करत आहेत. जर टीएमसीला सपा-बसपा महाआघाडीपेक्षा कमी जागा मिळाल्या तर ममता बॅनर्जी मायावतींच्या नावाला पाठिंबा देऊ शकतात. पश्चिम बंगालमधील प्रचारादम्यान भाजपा आणि तृणमूल यांच्यात झालेल्या वादावादीनंतर मायावतींनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देऊन त्यांच्याशी सुसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. आता काँग्रेसच्या नेतृत्वासोबतही मायावतींची चर्चा होऊ शकते. अखेरीस दिल्ली गाठण्यासाठी त्यांना काँग्रेसची मदत लागणारच आहे.