नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या या शेवटच्या टप्प्यात चंदीगडमध्येही मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उमेदवार आणि माजी माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी एका वृत्तवाहिनीशी चर्चा केली. यावेळी भाजपा १५० च्या वर जाणार नाही आणि यावेळी ४ जूनला केवळ इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल, असा विश्वास मनीष तिवारी यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे उमेदवार मनीष तिवारी यांनी मतदानापूर्वी एबीपी न्यूजशी बोलताना आणखी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. बाहेरचा माणूस असल्याच्या आरोपांवर मनीष तिवारी म्हणाले की, मी फक्त चंदीगडचा आहे. हे माझे वडिलोपार्जित घर आहे. माझे वडील या चंदीगडमध्ये शहीद झाले, त्यांना दहशतवाद्यांनी मारले. बाहेरचे भाजपाचे उमेदवार संजय टंडन हे स्वतः अमृतसरचे आहेत.
याचबरोबर, मनीष तिवारी यांनी आपल्या विजयाबद्दल मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, "मला विश्वास आहे की, मी जिंकेन. भाजपा १५० च्या वर जाणार नाही आणि यावेळी ४ जूनला केवळ इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल. मल्लिकार्जुन खर्गे हे अनुभवी नेते आहेत, ते समजत आहेत की यावेळी इंडिया आघाडी सरकार स्थापन करणार आहे, त्यामुळेच आघाडीच्या पार्टनर्सची बैठक बोलावली आहे."
दरम्यान, पवन बन्सल प्रचारात दिसत नसल्याबद्दल विचारल्यानंतर मनीष तिवारी म्हणाले, ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांना माझा पाठिंबा असल्याचा मला पूर्ण विश्वास आहे. याशिवाय. मनीष तिवारी यांनी पहिल्यांदाच भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेवर मौन सोडले. ते म्हणाले, "मी गेली अनेक वर्षे राजकारणात आहे, त्यामुळे सर्वांशी माझे संबंध आहेत, पण मी कधीही भाजपामध्ये जाण्याचा विचार केला नाही आणि मी कधीही भाजपामध्ये प्रवेश करणार नाही. आमचा लढा त्यांच्या विचारधारेविरुद्ध आहे."