Kanhaiya Kumar performs hawan ahead of his nomination : नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी सहाव्या टप्प्यात २५ मे रोजी दिल्लीतील सातही जागांवर मतदान होणार आहे. याठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. दरम्यान, काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार आज उत्तर पूर्व दिल्लीतून उमेदवारी अर्ज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमार यांनी पूजा-हवन केले. त्यांनी सर्व धर्माच्या गुरूंचे आशीर्वादही घेतले.
मुस्लिमबहुल उत्तर पूर्व दिल्लीच्या जागेवर भाजपाचे मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात लढत होणार आहे. मनोज तिवारी हे येथून दोन वेळा खासदार आहेत तर कन्हैया कुमार हे पहिल्यांदाच या जागेवरून निवडणूक लढवत आहेत. २०१९ मध्ये कन्हैया कुमार यांनी पहिल्यांदाच बेगुसराय मतदारसंघातून संसदीय निवडणूक लढवली होती, पण त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता उत्तर पूर्व दिल्लीतील कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या दहा जागा येतात. यामध्ये बुराडी, तिमारपूर, सीमापुरी, रोहतास नगर, सीलमपूर, घोंडा, बाबरपूर, गोकलपूर, मुस्तफाबाद आणि करावल नगर या जागांचा समावेश आहे. या दहा विधानसभा जागांपैकी रोहतास नगर, घोंडा आणि करवल नगरमध्ये भाजपाचे आमदार आहेत तर उर्वरित सात आमदार आम आदमी पक्षाचे (आप) आहेत. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची मतदान पद्धत वेगळी आहे. त्यामुळे लोकसभेची लढत चुरशीची असणार आहे.
मनोज तिवारी तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणातभाजपाने मनोज तिवारी यांच्यावर तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आहे. दिल्लीतील सातपैकी सहा खासदारांची तिकिटे भाजपाने रद्द करून त्यांच्या जागी नवीन चेहरे उभे केले आहेत, तर मनोज तिवारी हे एकमेव खासदार आहेत, ज्यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास दाखविला आहे. मनोज तिवारी यांनी उत्तर पूर्व दिल्ली जागेवर जेपी अग्रवाल आणि शीला दीक्षित यांसारख्या दिग्गज काँग्रेस नेत्यांचा पराभव केला आहे. अशा परिस्थितीत कन्हैया कुमार हे उत्तर पूर्व दिल्लीच्या जागेवर मनोज तिवारी यांना कशाप्रकारे टक्कर देऊ शकतील, हे ४ जूनलाच कळेल.
२५ मे रोजी दिल्लीत सहाव्या टप्प्यात मतदान होणारदिल्लीच्या सातही जागांवर सहाव्या टप्प्यात २५ मे रोजी मतदान होत आहे. यावेळी दिल्लीत काँग्रेस तीन जागांवर तर आप चार जागांवर निवडणूक लढवत आहे. काँग्रेसने उत्तर पूर्व दिल्लीतून कन्हैया कुमार, उत्तर पश्चिम दिल्लीतून उदित राज आणि चांदनी चौकमधून जेपी अग्रवाल यांना तिकीट दिले आहे. तर आपने नवी दिल्लीतून सोमनाथ भारती, दक्षिण दिल्लीतून सहिराम पहेलवान, पश्चिम दिल्लीतून महाबल मिश्रा आणि पूर्व दिल्लीतून कुलदीप कुमार यांना उमेदवारी दिली आहे.