काँग्रेसने मंगळवारी 43 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत पक्षाने राजस्थानमधील दहा उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. काँग्रेस उमेदवारांच्या या यादीवर राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या दहा उमेदवारांची नावं पुढे आली आहेत ते सर्व विजयी उमेदवार असल्याचं त्यांनी सांगितलं.
पत्रकारांशी बोलताना सचिन पायलट म्हणाले की, "हरियाणातील विद्यमान लोकसभा खासदार भाजपा सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले. राजस्थानमध्येही एका विद्यमान खासदाराने भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विद्यमान आमदार, खासदार आमच्याकडे येत आहेत. भाजपामध्ये जाणारे माजी आमदार आहेत, त्यामुळे लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे."
सचिन पायलट पुढे म्हणाले की, "जे काँग्रेसची विचारधारा स्वीकारत आहेत आणि आमच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आहेत, त्यांचे पक्षात स्वागत केले जात आहे आणि त्यांना संधी दिली जात आहे. मला आनंद आहे की पक्षाने त्यांची कामगिरी ओळखली आहे."
"लोकांनाही पक्षाशी असलेल्या बांधिलकीच्या आधारावर संधी देण्यात आली आहे. मी अनेक राज्यांचा दौरा केला असून, इंडिया आघाडीसाठी चांगले वातावरण निर्माण होत आहे. विशेषत: उत्तर भारतात मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपामध्येच होणार आहे."