बिनविरोध विजयानंतर सुरतमध्ये मोठी राजकीय खेळी! काँग्रेसचे उमेदवार राहिलेले नीलेश कुंभाणी भाजपामध्ये प्रवेश करणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 01:31 PM2024-04-23T13:31:23+5:302024-04-23T13:32:05+5:30
Lok Sabha Election 2024: भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांच्या बिनविरोध विजयामुळे काँग्रेसचे उमेदवार असलेले नीलेश कुंभाणी सध्या चर्चेत आहेत.
सुरत : गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाने खातं उघडले आहे. छाननीवेळी काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभाणी यांचा अर्ज बाद झाल्यानंतर अन्य उमेदवारांनीही अर्ज मागे घेतल्याने सुरतचे भाजपा उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ पारधी यांनी मुकेश दलाल यांच्या विजयाची घोषणा करत त्यांना प्रमाणपत्र दिले. यानंतर आता सुरतमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.
भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांच्या बिनविरोध विजयामुळे काँग्रेसचे उमेदवार असलेले नीलेश कुंभाणी सध्या चर्चेत आहेत. नीलेश कुंभाणी हे भाजपामध्ये सामील होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, नीलेश कुंभाणी लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्तामुळे काँग्रेस कार्यकर्ते त्यांना विरोध करत आहेत. नीलेश कुंभाणी यांना देशद्रोही आणि लोकशाहीचा हत्यारा म्हणत काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर निदर्शने करत आहेत.
दुसरीकडे, सुरत लोकसभा जागेवर भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांच्या बिनविरोध विजयानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. मुकेश दलाल यांना अनावश्यक प्रभावातून विजयी घोषित केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या जागेवर नव्याने निवडणुका घ्याव्यात, अशी काँग्रेसची मागणी आहे. काँग्रेसने असा दावा केला आहे की, भाजपाला व्यापारी समुदायाची भीती वाटत होती, त्यामुळेच त्यांनी सूरत लोकसभा मतदारसंघात मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केला.
दरम्यान, गुजरातमधील सर्व २६ जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान आहे. त्यासाठी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. सुरत मतदारसंघातील बसपाचे प्यारेलाल भारती, तीन छोटे पक्ष व चार अपक्षांनी आपला अर्ज मागे घेतला. तत्पूर्वी छाननीवेळी कॉंग्रेसचे नीलेश कुंभाणी यांच्या अर्जावरील सूचकांच्या स्वाक्षरी बनावट आढळल्याने अर्ज बाद ठरविला होता. कुंभाणी यांच्याऐवजी डमी उमेदवार असलेले सुरेश पडसाला यांचाही अर्ज बाद झाला होता. त्यामुळे भाजपाचे मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झाले. त्यामुळे गुजरातमध्ये आता केवळ २५ जागांसाठी मतदान होईल.