गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाचं खातं उघडण्याची शक्यता आहे. सूरत लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. तर आता येथून रिंगणात असलेले ७ अपक्ष उमेदवारही आपला अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. मात्र आता सर्वांच्या नजरा ह्या बसपाच्या उमेदवारावर आहेत. आता बसपानेही उमेदवारी अर्ज मागे घेतला तर येथून भाजपाचा बिनविरोध विजय होऊ शकतो.
सूरत लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे. त्यानंतर भाजपा येथून बिनविरोध जिंकणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. या मतदारसंघातून एकूण १० जणांनी अर्ज दाखल केला होता. मात्र येथून काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज रद्द झाला आहे. त्यामुळे आता भाजपा उमेदवाराविरोधात आता ८ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र हे आठही उमेदवार आपली उमेदवारी मागे घेतील, अशी चर्चा सुरू आहे.
गुजरातमधील लोकसभेच्या २६ जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख १९ एप्रिल होती. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २२ एप्रिल आहे. भाजपाने तक्रार केल्यानंतर काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज अनुमोदकांमुळे फेटाळला गेल्याचे सांगण्यात येत आहे. आता बसपाचे उमेदवार काय भूमिका घेतात यावर इथल्या निवडणुकीचं गणित अवलंबून असेल. तसेच काँग्रेस आता आपली ताकद बसपा उमेदवार किंवा एखाद्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतो.