Shashi Tharoor to Contest From Thiruvananthapuram : नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने शुक्रवारी (८ मार्च) लोकसभा निवडणुकीसाठी ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते आणि खासदार शशी थरूर यांना पुन्हा एकदा केरळमधील तिरुवनंतपुरममधून तिकीट मिळाले आहे. त्यामुळे शशी थरूर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसने उमेदवार बनवल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
शशी थरूर यांनी एक व्हिडिओद्वारे म्हटले आहे की, "काँग्रेस पक्षाने मला माझी जागा वाचवण्याची संधी दिली, यामुळे मला सन्मान आणि नम्र असल्याचे वाटत आहे. मी निष्पक्ष आणि प्रभावी लढतीसाठी उत्सुक आहे. १५ वर्षांच्या राजकारणात मला नकारात्मक प्रचारासाठी एक दिवसही घालवण्याची गरज पडली नाही." तसेच, इतर पक्षांच्या उमेदवारांप्रती असलेल्या राजकीय शिष्टाचाराबद्दलही त्यांनी भाष्य केले. राजकीय लढा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
२००९ पासून सतत विजयी शशी थरूर २००९ पासून तिरुअनंतपुरममधून सतत विजयी होत आहेत. अशा स्थितीत त्यांना पुन्हा एकदा या जागेवरून उमेदवारी देणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. दरम्यान, इस्रायल, हमास आणि इतर अनेक मुद्द्यांवर शशी थरूर यांनी अशी विधाने केली होती, त्यामुळे पक्ष अडचणीत आला होता. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत जोरदार चर्चा रंगली होती.
केरळमधील १६ उमेदवार घोषितशुक्रवारी जाहीर झालेल्या काँग्रेसच्या पहिल्या यादीत सर्वाधिक १६ उमेदवार केरळमधील आहेत. पक्षाने केरळमध्ये आपले सर्व १५ विद्यमान लोकसभा सदस्य पुन्हा उभे केले आहेत. केरळमध्ये लोकसभेच्या एकूण २० जागांपैकी १६ जागांवर काँग्रेस निवडणूक लढवणार आहे. मित्रपक्ष चार जागांवर निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, काँग्रेसने छत्तीसगडमधील सहा, कर्नाटकातील सात, तेलंगणातील चार, मेघालयातील दोन आणि लक्षद्वीप, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी एका जागेसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.