भ्रष्टाचाराशिवाय काँग्रेस श्वासही घेऊ शकत नाही; पंतप्रधान मोदींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 07:49 AM2023-07-08T07:49:48+5:302023-07-08T07:50:01+5:30
येथे एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, भ्रष्टाचाराशिवाय काँग्रेस श्वासही घेऊ शकत नाही.
रायपूर : भ्रष्टाचार ही काँग्रेसची सर्वांत मोठी विचारधारा असल्याचे वर्णन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील सर्वांत जुन्या राजकीय पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, जर काँग्रेस भ्रष्टाचाराची हमी (गॅरंटी) असेल, तर ते (पंतप्रधान) भ्रष्टाचारावर कारवाईची हमी आहेत.
येथे एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, भ्रष्टाचाराशिवाय काँग्रेस श्वासही घेऊ शकत नाही. छत्तीसगडमधील घोटाळ्यात बुडालेले काँग्रेस सरकार कुशासनाचे मॉडेल बनले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या सरकारला बाजूला हटविण्याचे जनतेने ठरविले आहे. इतकेच नाहीतर, पंतप्रधानांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले की, जो घाबरतो तो मोदी नाही. हे लोक माझी कबर खोदण्याची भाषा करतात. ते म्हणाले की, छत्तीसगडच्या निर्मितीमध्ये भाजपचा मोठा वाटा आहे. छत्तीसगडच्या विकासासाठी पुढील २५ वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत.
छत्तीसगडमध्ये १० प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये सुमारे ७६०० कोटी रुपयांच्या १० प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. राजधानी रायपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील कांकेर जिल्ह्यातील अंतागड आणि रायपूरदरम्यान नवीन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.
उत्तर प्रदेशात ‘वंदे भारत’ला हिरवा झेंडा
पंतप्रधानांनी गोरखपूर - लखनौ वंदे भारत एक्स्प्रेसला गोरखपूर रेल्वे स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवला. तत्पूर्वी त्यांनी जोधपूर ते अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसलाही हिरवा झेंडा दाखवला. गोरखपूर रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा शुभारंभही मोदींनी केला.
पंतप्रधान आज तेलंगणात
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी वारंगलमध्ये ६१०० कोटी रुपयांच्या अनेक महत्त्वाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी प्रसिद्ध भद्रकाली मंदिराला भेट देतील.
मुख्यमंत्री बघेल यांची टीका
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, तुम्ही आलात आणि खोट्याचे वारे वाहू लागले. जर तुमच्या सरकारची भूमिका राज्यांच्या धान खरेदीत एवढीच असेल, तर तुमच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना १००० - १२०० रुपये प्रति क्विंटलने धान विकायला का भाग पाडले जाते.