2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 300 जागा जिंकू शकत नाही; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 09:55 AM2021-12-02T09:55:12+5:302021-12-02T10:00:54+5:30
लोकसभेत बहुमत असलेले सरकारच कलम 370 हटवू शकते. 2024 च्या निवडणुका जिंकून काँग्रेसचे 300 खासदार संसदेत पोहोचतील, असे मला वाटत नाही.
नवी दिल्ली:काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद(Ghulam Nabi Azad) यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीबद्दल निराशाजनक दावा केला आहे. 'सध्याची परिस्थिती अशीच राहिली तर 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 300 जागाही जिंकू शकेल, असे मला वाटत नाही,' असे ते म्हणाले.
काँग्रेसची परिस्थिती बिकट
बुधवारी जम्मू-काश्मीरच्या पूंछ येथे एका सभेला संबोधित करताना आझाद यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसची सध्याची परिस्थिती वाईट आहे. भविष्यातही आताची परिस्थिती कायम राहिल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 300 जागा मिळतील, असे मला वाटत नाही. 370 चे प्रकरण प्रलंबित आहे. यावर सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारच निर्णय घेऊ शकते. त्यामुळे मी तुम्हाला खोटी आशा दाखवणार नाही.
तुम्हाला खोटे वचन देणार नाही...
गुलाम नबी आझाद पुढे म्हणाले की, फक्त तुम्हाला खूश करण्यासाठी जे आपल्या हातात नाही, त्यावर मी बोलणार नाही. मी तुम्हाला खोटी आश्वासने देणे, कलम 370 बद्दल बोलणे योग्य नाही. लोकसभेत बहुमत असलेले सरकारच कलम 370 हटवू शकते. सरकार स्थापन करण्यासाठी 300 खासदारांची गरज आहे. 2024 च्या निवडणुका जिंकून आमचे 300 नेते संसदेत पोहोचतील असे मी वचन देऊ शकत नाही. 2024 मध्ये आम्ही 300 जागांवर जाऊ असेही मला वाटत नाही. मी तुम्हाला कोणतेही चुकीचे वचन देणार नाही, असेही ते म्हणाले.
माझे भाषण चुकीच्या पद्धतीने दाखवले
जम्मू प्रांतातील किश्तवार जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना, ओमर अब्दुल्ला यांनी आझाद यांच्या कथित वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. आझाद यांनी कलम 370 बद्दल बोलणे व्यर्थ असल्याचे म्हटले होते. त्यावर आझाद म्हणाले की, माध्यमांनी काश्मीरमधील माझ्या भाषणाचे चुकीचे चित्रण केले आणि माझ्या त्या भाषणाला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले. कलम 370 वर आमची एकच भूमिका आहे, हे मी स्पष्ट करतो.