भूज - काँग्रेसने पाकिस्तानी दहशतवादी आणि मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या सुटेकेचे सेलिब्रेशन साजरे केले असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी भूज येथील सभेत बोलताना केला. आजपासून गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभांना सुरुवात झाली आहे. मोदींनी गुजरातीमध्ये भाषण केले आणि त्यांच्या टि्वटर हँडलरुन या भाषणाचे इंग्रजी भाषांतर टि्वट करण्यात आले.
लष्कर-ए-तय्यबाचा प्रमुख हाफिज सईदची सुटका हे मोदी सरकारचे कुटनितीक अपयश आहे अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केली होती. त्याला उत्तर देताना मोदींनी काँग्रेसने हाफिज सईदच्या सुटकेचा आनंद साजरा केल्याचा आरोप केला. पाकिस्तानी कोर्टाने पाकिस्तानी दहशतवाद्याची सुटका केली आणि काँग्रेस या सुटकेचा आनंद साजरा करत आहे. मला याचे आश्चर्य वाटते. हीच काँग्रेस स्वत:च्या लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईकवर विश्वास ठेवत नाही पण चीनच्या राजदूतावर विश्वास ठेवते असा आरोप मोदींनी केला. डोकलाममध्ये आपले सैन्य 70 दिवसांपासून चीनच्या नजरेला नजर भिडवून उभे होते. त्यावेळी तुम्ही चिनी राजदूतांना मिठी का मारली ? असा सवाल मोदींनी विचारला.
26/11 मुंबई हल्ल्याचा विषय काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने ज्या पद्धतीने हाताळला त्यावरही मोदींनी टीका केली. भारतावर 26/11 ला हल्ला झाला आणि उरीमध्येही हल्ला झाला. या दोन्ही हल्ल्यांच्यावेळी भारताने कशी पद्धतीने प्रतिक्रिया दिली हे तुम्ही पाहिले आहे. दोन सरकारमधला फरक यातून लक्षात येतो असे मोदी भूज येथील सभेत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये चार सभांना संबोधित करणार आहेत. भुज, जसदण, धारी अमरेली व कमरेज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होणार आहेत. पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये जवळपास 30 जाहीर सभा घेण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत 148 उमेदवारांच्या नावाची घोषणा दरम्यान, भाजपानं आतापर्यंत 182 जागांपैकी 148 जागांसाठी आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपाकडून 5 याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिल्या यादीत 70, दुस-या यादीत 36, तिस-या यादीत 28, चौथ्या यादीत 1 आणि पाचव्या यादीत 13 उमेदवारांचे नाव घोषित करण्यात आले होते.
गुजरातमध्ये शिवसेनेच्या विजयासाठी 25 रुपयांचा भाव, सट्टेबाजाराची पहिली पसंती भाजपाला सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमधून गुजरातमध्ये भाजपाविरोधी वातावरण दिसत असले तरी सट्टेबाजांनी गुजरातमध्ये विजयासाठी भारतीय जनता पार्टीलाच पहिली पसंती दिली आहे. गुजरातमध्ये भाजपा 118 ते 120 जागा जिंकेल तर काँग्रेसला 80 जागांवर समाधान मानावे लागेल असा सट्टेबाजाराचा अंदाज आहे. गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागा आहेत. हिंदुस्थान टाइम्सने सट्टाबाजारातील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. . गुजरातेत भाजपा आणि काँग्रेसमध्येच मुख्य लढत आहे. आम आदमी पार्टीवर 1 रुपयावर 10 रुपयांचा भाव चालू आहे. शिवसेनेवर गुजरामध्ये 1 रुपयावर 25 रुपयाचा भाव आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर 1 रुपयावर 30 रुपयाचा भाव चालू आहे