काँग्रेसनं 'वंदे मातरम'च्या माध्यमातून देशाचं विभाजन केलं; अमित शहांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 11:00 AM2018-06-28T11:00:53+5:302018-06-28T11:02:29+5:30
भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसनं वंदे मातरमचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला असून, त्याच्या माध्यमातूनच देशाला विभाजित केलं आहे, असा आरोप भाजपाध्यक्ष अमित शाहांनी केला आहे.
नवी दिल्ली- भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसनं वंदे मातरमचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला असून, त्याच्या माध्यमातूनच देशाचं विभाजन केलं आहे, असा आरोप भाजपाध्यक्ष अमित शाहांनी केला आहे. अमित शाह दोन दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौ-यावर आहेत. त्यावेळी एका सभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.
1937मध्ये काँग्रेसनं वंदे मातरमचा स्वीकार केला होता आणि त्याला राष्ट्रीय गीताचा सन्मान देण्याच्याही काँग्रेस तयारीत होता. परंतु त्यांनी सुरुवातीच्या काही भागाचा सोयीस्करपणे वापर केला आणि त्यामुळेच देशाची फाळणी झाली. काँग्रेसनं तेव्हा ती घोडचूक केली नसती तर आज देश एकसंध राहिला असता, काँग्रेसच्या त्या चुकीमुळे देशात फाळणीचे वारे वाहू लागले आणि जातीय पेच निर्माण झाला, असा आरोपही अमित शाहांनी केला आहे. वंदे मातरम् हे पहिल्यांदा कोणत्याही धर्माशी जोडलं गेलेलं नव्हतं आणि आताही नाही. त्यामुळे वंदे मातरमच्या मुद्द्यावरून आम्ही कधीच कोणाला अंधारात ठेवलेलं नाही. परंतु काँग्रेसनं वंदे मातरमला धर्माशी जोडून नव्या वादाला फोडणी दिली होती. काँग्रेसच्या त्या चुकीमुळेच देशाला विभाजित व्हावं लागलं, असंही अमित शाह म्हणाले आहेत.
गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पंचायत निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळालं होतं. त्यामुळे अमित शाहा पश्चिम बंगालमध्ये दोन दिवस तळ ठोकून राहणार असून, लोकसभेच्या निवडणुकीसाठीही रणनीती आखणार आहे. अमित शाह दुस-या दिवशी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बीरभूम जिल्ह्यातल्या तारापीठ येथे जाऊन पूजा-अर्चा करणार आहेत. तसेच बीरभूम जिल्ह्यात ते भाजपा नेत्यांबरोबर बैठकही घेणार आहेत. त्यानंतर ते पुरुलियात जाऊन भाजपाच्या हत्या करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना भेट देणार आहेत. याच दरम्यान शाह पुरुलियामध्ये एका रॅलीलाही संबोधित करणार आहेत.