काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाची निवडणूक समिती स्थापन केली आहे. या समितीत पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह एकूण 16 नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणूक काळात या समितीची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. कारण निवडणुकीसाठी कुणाला तिकीट द्यायचे आणि कुणाला नाही, याचा निर्णय हीच समिती घेत असते. याशिवया निवडणुकीशी संबंधित इतर कामांतही या समितीची भूमिका महत्वाची मानली जाते.
संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या पत्रात ज्या 16 नेत्यांचा समावेश आहे, त्यांत मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, अंबिका सोनी, अधीर रंजन चौधरी, सलमान खुर्शीद, मधुसूदन मिस्त्री, एन उत्तम कुमार रेड्डी, टीएस सिंह देव, केजे जॉर्ज, प्रीतम सिंह, मोहम्मद जावेद, अमी याजनिक, पीएल पुनिया, ओमकार मरकाम आणि केसी वेणुगोपाल यांच्या नावांचा समावेश आहे.
महत्वाचे म्हणजे, या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, मिझोरम येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काही जागांवर भाजपने आपले उमेदवारही जाहीर केले आहेत. तर लोकांना काँग्रेसच्या यादीची प्रतीक्षा आहे. आता ही समितीय यासंदर्भात विचार-विनिमय करेल आणि कुणाला तिकीट द्यायचे आणि कुणाला नाही, यासंदर्भात निर्णय घेईल.