शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 06:24 PM2024-06-01T18:24:36+5:302024-06-01T18:24:55+5:30
इंडिया आघाडीची नवी दिल्ली इथं बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर काँग्रेसने आपला निर्णय बदलला आहे.
INDIA Meeting ( Marathi News ) : देशात लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज सायंकाळी ६ वाजता पार पडली. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असला तरी आता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर काही वेळातच विविध संस्थांकडून एक्झिट पोलच्या माध्यमातून निकालाचे अंदाज वर्तवले जाणार आहेत. या एक्झिट पोल्सबाबतच्या चर्चेत सहभागी व्हायचे नाही, असा निर्णय काँग्रेस पक्षाकडून घेण्यात आला होता. मात्र आज इंडिया आघाडीची नवी दिल्ली इथं बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर काँग्रेसने आपला निर्णय बदलला असून काँग्रेससह इंडिया आघाडीतील इतर पक्षांचे प्रवक्ते एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी होतील, अशी माहिती काँग्रेस नेते पवन खेरा यांनी दिली आहे.
"इंडिया आघाडीची बैठक आज पार पडली. या बैठकीत एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी होऊन भाजपचा भांडाफोड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक्झिट पोलबाबतच्या चर्चेत सहभागी होण्याचे फायदे आणि तोटे यांचा सारासार विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे," अशी माहिती पवन खेरा यांनी दिली आहे.
बैठकीला कोण-कोण होतं उपस्थित?
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बोलावलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि संजय सिंह, तेजस्वी यादव, अखिलेश यादव व इतर नेते उपस्थित होते. मात्र पश्चिम बंगालमध्ये मतदान सुरू असल्याने तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि इतर नेते या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे सुद्धा या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे निकाल इंडिया आघाडीच्या बाजूने लागतील, असा काँग्रेसचा विश्वास आहे. एवढंच नाही तर पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांचा दावा आहे की, ४ जून रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर एनडीएचे अनेक मित्रपक्ष इंडिया आघाडीत सहभागी होतील. ते म्हणाले की, दोन टप्प्यांनंतरच इंडिया आघाडीला बहुमत मिळाले आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, यूपी, बिहार, तेलंगणा, हरियाणा या राज्यांमध्ये काँग्रेसने यावेळी चांगली कामगिरी केली आहे, असा दावाही त्यांनी कला आहे.