काँग्रेसने अखेरच्या क्षणी बदलला महाराष्ट्रातील राज्यसभा उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 07:54 AM2022-05-31T07:54:21+5:302022-05-31T10:06:06+5:30
गांधी कुटुंबाच्या निष्ठावानांना मिळाली उमेदवारी
- आदेश रावल
नवी दिल्ली : काँग्रेसने रविवारी राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. यातून हे दिसून येते की, गांधी कुटुंबाच्या निष्ठावंतांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यातून पक्षात आणि विशेषतः असंतुष्ट नेत्यांना हा संदेश देण्यात आला आहे की, कुटुंबाप्रती विश्वास ठेवला तर पक्ष आपला विचार करेल.
बिहारमधून माजी संसद सदस्य रंजिता रंजन, माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि सरचिटणीस मुकुल वासनिक यांना सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय असल्याचा फायदा झाला आहे. तर, सरचिटणीस आणि मीडिया प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला, सरचिटणीस अजय माकन आणि जयराम रमेश यांना राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असल्याचा फायदा झाला. प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय उत्तर प्रदेशातील राजीव शुक्ला, प्रमोद तिवारी आणि इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी मिळाली.
मोदींनी आपल्याच मंत्र्याचा पत्ता कापला; राज्यसभेचे तिकीट नाकारले
काँग्रेस एका अल्पसंख्याक नेत्याला राज्यसभेत पाठवू इच्छित होती. यात गुलाम नबी आझाद आणि इम्रान प्रतापगढी यांची नावे चर्चेत होती. आझाद यांना महाराष्ट्रातून उमेदवार बनविण्यावर सहमती झाली होती. अखेर प्रियांका गांधी यांच्या हस्तक्षेपानंतर इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून उमेदवार बनविण्यात आले. महाराष्ट्रातील नेत्यांनी प्रभारी एच. के. पाटील यांना फोन करून या निर्णयाला विरोध केला हाेता.
सहाव्या उमेदवाराचे भवितव्य अपक्ष अन् लहान पक्षांच्या हाती; घोडेबाजाराला येणार ऊत
पाठिंब्याचे बळ, नाराजीची झळ!
उत्तर प्रदेशातील प्रख्यात उर्दू कवी इम्रान प्रतापगढी यांना काँग्रेसमधून पाठिंब्याचे बळ अन् नाराजीची झळही सोसावी लागत असल्याचे चित्र आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी इम्रान यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. एका राज्यातील नेते दुसऱ्या राज्यातून राज्यसभेवर जातात यात नवीन काहीही नाही. आपले मुकुल वासनिक राजस्थानमधून उमेदवार आहेत. इम्रान प्रतापगढी हे तरुण, उत्साही आहेत, आम्ही सगळे त्यांना निश्चितपणे निवडून आणू, असे दोघांनीही ठामपणे सांगितले.
दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रतापगढी यांची निवड आपल्या आकलनापलीकडची असल्याची टिप्पणी त्यांनी केली. इम्रान यांना उत्तर प्रदेशातून, तर मुकुल वासनिक यांना राजस्थानएवजी महाराष्ट्रातून उमेदवारी देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा सोनियाजींनी मला राज्यसभेत पाठविण्याचा शब्द दिला होता. आता त्याला १८ वर्षं झाली. माझ्यात काय उणीव आहे? माझी १८ वर्षांची तपस्या कमी पडली, अशा शब्दांत अभिनेत्री नगमा यांनी इम्रान यांच्या उमेदवारीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.