चंदीगड - बँक कर्ज घोटाळा प्रकरणात जावयाचे नाव आल्याने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग अडचणीत सापडले आहेत. सिंभोली शुगर्स लिमिटेड या कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या जावयाचे नाव आहे. सिंभोली शुगर्स लिमिटेडवर 97.85 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असून कॅप्टन अमरिंदर यांचे जावई गुरपाल सिंग या बँकेत उपमहाव्यवस्थापक आहेत.
पंजाब नॅशनल बँकेत नीरव मोदीने केलेला 11,300 कोटी रुपयांचा महाघोटाळा उघड झाल्यानंतर एकापाठोपाठ एक देशातील बँकिंग क्षेत्रातील घोटाळे उघड होत आहेत. सिंभोली शुगर्स लिमिटेड हा देशातील सर्वात मोठा साखर कारखाना आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये दोन कर्जांचा उल्लेख केला आहे. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सकडून घेतलेली ही दोन कर्जे तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. बँकेने 97.85 कोटीच्या कर्जाला 2015 साली घोटाळा ठरवले होते. त्यानंतर 110 कोटींचे कॉर्पोरेट कर्ज घेऊन 97 कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यात आले.
29 नोव्हेंबर 2016 साली या कॉर्पोरेट कर्जाला बुडीत कर्ज ठरवण्यात आले. 17 नोव्हेंबर 2017 रोजी बँकेने यासंबंधी सीबीआयकडे तक्रार दाखल केली. यावर्षी 22 फेब्रुवारीला सीबीआयने यासंबंधी एफआयआर दाखल केला. अमरिंदर यांच्या जावयाशिवाय सिंभोली शुगर्स लिमिटेडच्या 12 अन्य पदाधिकाऱ्यांचेही एफआयआरमध्ये नाव आहे. याप्रकरणी सीबीआयने आठ ठिकाणी छापे मारले आहेत.