नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीतील राजपाथवर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आसन व्यवस्थेवरुन गुरुवारी (24 जानेवारी ) सुरू झालेला वाद प्रजासत्ताक दिनीदेखील कायम होता. राहुल गांधी यांनी चौथ्या रांगेत बसवण्यात येणार असल्याचं माहिती समोर आली होती. मात्र प्रजासत्ताक दिनी राहुल गांधी यांनी चौथ्याऐवजी सहाव्या रांगेत बसवण्यात आलं होते. यावर काँग्रेसनं आपली नाराजी जाहिररित्या दाखवली.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आसन व्यवस्था सहाव्या रांगेत केल्याप्रकरणी काँग्रेसनं मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार सूड भावनेनं ही वागणूक दिल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. काँग्रेस नेता रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले आहे की, प्रजासत्ताक दिनी अहंकारी शासनानं सर्व परंपरा बाजून सारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सुरुवातीला चौथ्या रांगते बसवणार असल्याचं सांगत मुद्दाम सहाव्या रांगेत बसवलं.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडची दृश्य समोर आली आहेत. यामध्ये राहुल गांधी गुलाम नबी आझाद यांच्यासोबत सहाव्या पक्तीत बसल्याचे पाहायला मिळत आहे. याची माहिती सांगणारे पोस्ट रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले आहे. तर दुसरीकडे, कार्यक्रमात सहभागी झालेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या राहुल गांधी बसलेल्या रांगेपासून दोन रांग पुढे बसल्या होत्या. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह पहिल्या रांगेत बसले होते.
दरम्यान, यापूर्वीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची पहिल्या रांगेतच आसन व्यवस्था करण्यात येत होती. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, यासाठी त्यांची आसन व्यवस्था पहिल्या रांगेत करायला हवी होती, असे सांगत काँग्रेसनं आपली नाराजी व्यक्त केली आहे.