गांधीनगर : गुजरातमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गांधीनगरमध्ये एका रॅलीत कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी शेतकरी, जवान, न्यायपालिका आणि रोजगार या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर निशाना साधला.
याचबरोबर, राहुल गांधी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरुन भाजपावर टीका केला. पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेणारा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला काँग्रेसने पकडले होते. मात्र, कंदहार विमान अपहरण प्रकरणात भाजपा सरकारने मसूद अजहरला विमानात बसवून पाकिस्तानात पाठविले, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
केंद्र सरकारने जीएसटी देशात लागू करताना सांगितले होते की, देशात एक करप्रणाली असेल ती सुलभ असेल. मात्र, गब्बर सिंह टॅक्स आजपर्यंत छोट्या व्यापाऱ्यांना समजला नाही. जीएसटी करप्रणालीचा फटका अनेक छोट्या व्यापारांना बसला, अनेक व्यापारी बेरोजगार झाले. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली, तर सर्वप्रथम जीएसटी करप्रणालीत पुनर्रचना करुन व्यापारांना दिलासा देण्यात येईल, असेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.
याशिवाय, राहुल गांधी यांनी या सभेत बोलताना राफेल, जीएसटी, नोटाबंदी अशा अनेक मुद्द्यावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अनेक छोटे व्यापारी देशोधडीला लागले. नोटाबंदीच्या रांगेत सामान्य माणूस उभा होता. या रांगेत अंबानी उभे होते का ? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित जनसमुदायाला केला. राफेलवरुन मोदींना लक्ष्य करत राफेलच्या माध्यमातून हवाई दलाचे 30 हजार कोटी अनिल अंबानी यांच्या खिशात घातले गेले, असा आरोप राहुल गांधी यांनी पुन्हा केला. याच राफेल प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआय संचालकांना एका रात्रीत हटवले गेले असेही राहुल गांधी म्हणाले.
महात्मा गांधी यांचे विचार भारत देशाची ओळख आहे. एकीकडे महात्मा गांधी यांनी देश घडविण्यासाठी आपले प्राण दिले तर दुसरीकडे देश तोडण्याचे काम भाजपावाले करत आहेत. लोकांना न्याय मिळाला नाही तर लोक कोर्टात जातात. मात्र कोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन आम्हाला काम करु दिले जात नाही, असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी मोदी सरकारवर केला.